डोंबिवली : डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी मनसेने केलेल्या आंदोलनानंतर स्टेशन परिसर मुक्त श्वास घेऊ लागला होता. मनसेने घेतलेल्या पवित्र्यावर फेरीवाल्यांनी मनसेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र न्यायालयाच्या निर्देशाचे पालन झालेच पाहिजे या भूमिकेवर मनसे कायम राहिली. डोंबविलीतील अशीच एक चिमणी गल्ली आजही अनधिकृत फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकलेली पहावयास मिळत आहे. याकडे पालिका प्रशासनाकडून जाणीवपूर्वक लक्ष दिले जात नसल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे.
डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील १५० मीटर अंतराच्या आत चिमणी गल्ली आहे. अनेक वर्षांपासून या गल्लीमध्ये फेरीवाल्यांचे वर्चस्व असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अनेक वर्षांपासून ही परिस्थिती असून या गल्लीत पालिकेच्या फेरीवाला अतिक्रमण विभागाने अद्यापही कारवाई केली नसल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे फेरीवाल्यांचे आगामी ठिकाण चिमणी गल्ली असल्याचे म्हटले जात आहे.
नुकतेच चंद्रकांत जगताप यांनी पदभार स्विकारल्यावर स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करू असे पत्रकारांना सांगितले. मात्र चिमणी गल्लीतील अनधिकृत फेरीवाल्यांना हटविले जाईल असे ठामपणे सांगितले नाही. फेरीवाला अतिक्रमण विभागाचे पथकप्रमुख व कर्मचारी यांना चिमणी गल्ली फेरीवाला मुक्त करण्यास जमलं नसावं असे दिसत आहे. स्टेशन परिसर हा फेरीवाला मुक्त झालाच पाहिजे ही भूमिका कायम ठेवणाऱ्या मनसेच चिमणी गल्ली फेरीवाला मुक्त करेल अशी चर्चा शहरात सुरू आहे.

