मनसेकडून डोंबिवली स्टेशनची पाहणी

 


डोंबिवलीकर रेल्वे प्रवासी वर्गाने करायचे तरी काय ?

डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली स्टेशनबाबत अनेक गैरसोय आणि असुविधाबाबत अनेक तक्रारी आल्यावर बुधवारी मनसे पदाधिकाऱ्यांनी स्टेशनची पाहणी केली.यावेळी अनेक प्रवासी वर्गाने पदाधिकाऱ्यांना भेटून तक्रारीचा पाढाच वाचला.

     जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर,उपजिल्हाध्यक्ष सुदेश चुडनाईक,शहर अध्यकक्ष मंदा पाटील, शहर सचिव कोमल पाटील,संदीप म्हात्रे, स्मिता भणगे,प्रतिभा पाटील,सुमेधा थत्ते,नीलिमा भोईर हे उपस्थित होते.डोंबिवली रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेतील सर्वात जास्त व जास्त उत्पन्न देणारे स्थानक आहे.मात्र प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याने प्रवासी वर्ग नाराज झाले आहे.बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मनसे  पदाधिकारी यांनी डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसर येथे पाहणी केली.यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना डोंबिवली मधील प्रवासी वर्गाला रोज जो त्रास होत आहे त्याची जाणीव करून देण्यात आली.

डोंबिवलीमधील प्रवासी वर्गाने गेल्या काही दिवसात मनसे डोंबिवली कार्यालयामध्ये डोंबिवली रेल्वे स्थानकातील गैरसोयींबद्दल अनेक तक्रारी नोंदवल्या होत्या.डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच वरील सी एस एम टी दिशेने असणारी शेड अपूर्ण अवस्थेत आहे.गेल्या सहा महिन्यापासून हा त्रास प्रवासी वर्गाला विशेष करून महिला वर्गाला सहन करावा लागत आहे.त्याचबरोबर या ठिकाणी विद्युत दिव्यांची सुद्धा व्यवस्था नाही.त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतोनात त्रास होत आहे.तसेच डोंबिवली स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाले महापालिकेची कारवाई सुरू असताना आपला माल रेल्वेच्या हद्दीत ठेवतात त्याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.स्कायवॅाकवर सुद्धा अनधिकृत फेरीवाल्यांनी उच्छाद मांडला आहे. 

काही वर्षांपूर्वी प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेली एस्कलेटर सालाबादप्रमाणे यंदाही पावसाळ्यात बंद अवस्थेत आहे.पावसाचे पाणी एस्कलेटर मध्ये घुसल्यामुळे सदरची सेवा दरवर्षी पावसाळ्यात बंद पडते.हे स्कलेटर सुरू करण्यापूर्वी पाण्याच्या नियोजनाचा विचार न केल्याने सदरची सेवा वारंवार खंडित होत आहे.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नव्याने एस्क्लेटर बांधण्याचे टेंडरचे काम सुरू आहे.याचाच अर्थ नियोजना अभावी रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे प्रवाशांच्या पैशाचा चुराडा केला गेला आहे. त्याचबरोबर डोंबिवली पूर्वेला असणारी लिफ्ट सुद्धा बंद अवस्थेत आहे.तिथेही पाणी शिरल्यामुळे लिफ्ट नादुरुस्त झालेली आहे.लिफ्ट आणि एसकलेटर हे बंद असल्याकारणाने ज्येष्ठ नागरिक महिला व विद्यार्थी यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मनसे महिला सेनेने हिरकणी कक्ष लवकरात लवकर सुरू करावा व स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवावीत अशी मागणी यावेळी केली.

डोंबिवली हे मध्य रेल्वेचे सर्वाधिक महसूल देणारे रेल्वे स्थानक असून लाखोंच्या संख्येने प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करत असतात.असे असूनही मध्य रेल्वेचे डोंबिवली स्थानकाकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे मनसे डोंबिवली शहराच्या वतीने डोंबिवली रेल्वे स्थानकाचे स्थानक प्रबंधक जी.के.शाहू,सीनियर सेक्शन इंजिनियर (लिफ्ट व एस्कलेटर)  विष्णु अवस्थी,वरिष्ठ अभियंता ठाकुर्ली अनिल रंगारी, आरपीएफचे इन्स्पेक्टर सुहास मनोहर यांच्या समवेत मनसे पदाधिकारी यांनी पाहणी केली व सदरच्या बाबींसाठी तात्काळ उपायोजना कराव्यात अशी मागणी केली. लवकरात लवकर डीआर एम यांची मुंबई येथे जाऊन वरील सर्व विषयांवर बैठक घेण्यात येईल असे यावेळी मनसे डोंबिवली शहराध्यक्ष घरत यांनी सांगितले.





Post a Comment

Previous Post Next Post