बदलापूर पाइपलाईन रस्त्यावर चक्क भाजीपाल्याची लागवड

 


डोंबिवलीजवळील शेतकऱ्यांची अनोखी शक्कल

        जमिनीच्या मोबदल्याची मागणी 

डोंबिवली ( शंकर जाधव )  : बदलापूर पाइपलाईन रस्ता हा मुख्यत्वे कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर तसेच कर्जत-कसारा आदी प्रवासासाठी महत्वाच्या रस्त्यावर शेतकऱ्यांनी अनोखी शक्कल लढवत चक्क रस्त्यावरच भाजीपाला शेतीची लागवड केली.संबंधित शेतकरी रस्ता व पाइपलाईन विकासासाठी दिलेल्या जागेचा मोबदला मिळाला नसल्याने अशाप्रकारे भाजीपाला करून कुटुंबाचे गुजरण होत असल्याचे सांगत आहे. शासन दरबारीही हा विषय गेला असून संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे समोर येत आहे.याबाबत शेतकऱ्यांसह काँग्रेस पदाधिकारी संतोष केणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांची भेट घेतली होती. शेतकऱ्यांवर अन्याय करून विकास करणार नाही, शेतकऱ्यांना न्याय मिळेल असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

   वसारगांव येथील शेतकरी लहू तुकाराम वायले यांनी याविषयी दिलेल्या माहितीनुसार हा विषय फार वर्षांपूर्वीचा असून आमचे कुटुंबप्रमुख अशिक्षित असल्याने ही स्थिती आहे. आता आम्ही शिकूनसवरून माहितीच्या आधारे सिद्ध केले आहे की महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिशाभूल केली आहे. या आमच्या जागेचा पूर्ण तपशील संबंधित खात्याला दिला असून कोठे काय चुकले याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे आम्ही सरकारच्या विकास कामाला व्यत्यय आणत नाही पण आमचा मोबदला द्या, आमची अधिक जागा घेतली ती परत द्या अशी कळकळीची विनंती करीत आहोत. याबाबत उद्योगमंत्री यांची भेट घेऊन त्यांना सर्व परिस्थिती समजून सांगितली आहे असेही हे शेतकरी सांगतात. नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव संतोष केणे यांनी संबंधित शेतकरी लहू तुकाराम वायले, नरेश रामा वायले, स्वप्निल लहू वायले, काशिनाथ पाटील, अरुण दशरथ वायले आदींशी याविषयी माहिती घेतली असता त्यांनी आपली व्यथा मांडली.

त्यांच्या मते भूमापन अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे जागेच्या मालकांना अद्याप मोबदला मिळत नाही. परिणामी या शेतकऱ्यांनी बदलापूर पाईपलाईन रस्त्यासाठी घेण्यात आलेल्या त्यांच्या रस्त्यावरील जागेत भाजीपाला लावला. गेली अनेक वर्षे हा प्रश्न प्रलंबित असून शासन दरबारी यासाठी उंबरठे झिजविले आहेत. लोकप्रतिनिधीनीही याबाबत समंजसपणाची भूमिका बजावली असली तरी अधिकारी याकडे कानाडोळा करीत आहेत. एमआयडीसी जोपर्यंत जागेचा मोबदला देणार नाही तोपर्यंत रस्त्याला जागा सोडणार नाही. आम्ही रस्त्यावर भाजीपाला करू असा ठाम निर्णय घेतला आहे.

शेतकरी लहू वायले सांगतात, याविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना याची माहिती दिली आहे. तसेच उद्योगमंत्री यांच्याशी झालेल्या बैठकीत त्यांनी आदेश दिला होता की, पाईपलाईन आणि रस्ता यासाठी लागणारी जागा घ्या आणि बाकी जमीन त्या शेतकरी मालकाला परत द्या. पण महसूल अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत व दिशाभूल करीत आहेत. आमदार गणपत गायकवाड यांनाही याबाबत सविस्तर माहिती आहे.

याबाबत संतोष केणे सांगतात, शेतकऱ्याला त्याच्या जागेचा मोबदला द्या. आजपर्यंत येथील भूमिपुत्रांनी सर्वच विकासकामांना हातभार लावला आहे. रस्ते, शाळा, उद्याने, रेल्वे आदी विविध विकास कामांना शेतकरी जर जागा देतो मग त्यांना अन्याय कशासाठी ? त्यांना त्यांचा मोबदला मिळाला तर ते सहकार्य करतील. आम्हाला विश्वास आहे शासन आमच्या पाठीशी असेल, मात्र अधिकारी शारीरिक व मानसिक त्रास देत आहेत याची चौकशी करावी.



Post a Comment

Previous Post Next Post