डोंबिवली ( शंकर जाधव ) : गेल्या आठवड्यात सतत पाऊस पडत असल्याने डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील रस्ता पाणी तुंबले होते. त्यावेळी दुकानदारांनी खबरदारी म्हणून दुकाने बंद ठेवली होती. गुरुवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली यामध्ये डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील परिसर पुन्हा जलमय झाल्याचे पहावयास मिळाले.
मुसळधार पावसात पुन्हा डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील परिसरात पाणी तुंबले. गुरुवारी सकाळ पासून दुकानदारांनी दुकानातील समान उचलण्यास सुरुवात केली होती. मात्र पावसाचा वाढता जोर वाढल्याने दुकानात पाणी शिरले होते.दुकानाचे नुकसान होऊ नये म्हणून दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली.दुपारपर्यंत पावसाचा जोर असल्याने दुकाने दिवसभर बंद होती.तर स्टेशन बाहेरील रिक्षा थांब्यावर रिक्षा उभ्या नसल्याने नागरिकांना काही अंतर पायी चालत स्टेशन गाठावे लागले.
दरदिवशी स्टेशनबाहेर दिसणारी गर्दी पाणी तुंबल्याने तुरळक दिसली.फेरीवाल्यांनी कधी नव्हे ते या दिवशी आपले बस्तान मांडले नव्हते.दुकानही बंद करून दुकानदार पाणी ओसरण्याची वाट पाहत होते.नागरिकांना भरपावसात रिक्षा मिळत नव्हती.स्टेशनपर्यत दुपारी रिक्षा जावे मुश्किल असल्याने जवळील इंदिरा चौक येथे प्रवासी उतरत होते.आता दरवर्षी पावसात स्टेशन बाहेरील परिसर जलमय होणे नवीन नाही असे डोंबिवलीकर म्हणत होते.