ज्येष्ठ लेखक प्रा. हरी नरके यांचे निधन

मुंबई: पुरोगामी चळवळीतील आघाडीचे विचारवंत व ज्येष्ठ लेखक प्रा. हरी नरके यांचे बुधवारी सकाळी निधन झाले.  मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीची व समता परिषदेची मोठी हानी झाली आहे. विचारवंत, लेखक, मालिका निर्माते, ब्लॉगर म्हणून ते महाराष्ट्राला परिचित होते.

हरी रामचंद्र नरके यांचा जन्म 1 जून 1963 साली झाला. मागच्या काही दिवसांपासून हरी नरके आजारी होते. त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे १५-२० दिवस उपचार घेतल्यानंतर महिन्याभरापूर्वी त्यांना राजकोट इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची प्रकृती स्थिर झाली होती. राजकोटहून मुंबईला येत असताना बुधवारी गाडीत त्यांना दोन वेळा उलट्या झाल्या. त्यानंतर त्यांना एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

 हिंदी, मराठी इंग्रजी भाषेत त्यांचे 37 ग्रंथ प्रकाशित झाले होते. महात्मा फुले साहित्याच्या हिंदी आणि इंग्रजी अनुवादांच्या खंडाचे ते संपादक होतो. 60 विद्यापाठातील चर्चामध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले होते. विविध वर्तमानपत्र, वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून 100 पेक्षा अधिक लेख प्रकाशित झालेत. महात्मा फुले हा त्यांच्या अभ्यासाचा आणि जिव्हाळ्याचा विषय होता. महात्मा फुले यांची बदनामी: एक सत्यशोधन आणि महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा ही त्यांची पुस्तकं प्रचंड गाजली. याशिवाय विविध सामाजिक विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण लिखाण केले होते. क्रांतीबा महात्मा फुले यांच्यावर विपुल लेखन त्यांनी केले.




श्रद्धा असलेला बुद्धीवादी, कृतीशील कार्यकर्ता गमावला

 "ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा असलेला, ओबीसी हक्कांसाठीच्या चळवळीत आघाडीवर राहून लढणारा कृतीशील कार्यकर्ता आपण गमावला आहे. ते सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक, परखड भाष्यकार होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक, संशोधक, व्याख्याते ही त्यांची ओळख होती. तत्कालीन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. प्रा. हरी नरके यांनी अनेक शासकीय समित्यांवर तज्ञ सदस्य म्हणून काम केलं आहे. त्यांच्या निधनानं दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांची बाजू हिरीरीनं मांडणारं, ओबीसी चळवळीला वाहून घेतलेलं बुद्धीवादी व्यक्तिमत्वं हरपलं आहे. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, परिवर्तनवादी चळवळीची हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यानी प्रा. हरी नरके यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post