दिवा ( शंकर जाधव ) : दिवा रेल्वे स्थानकात बुधवारी सकाळी साड़े सहा ते सात वाजताच्या सुमारास संतप्त प्रवाशांनी रेल्वे रोको केल्याने काहीच वेळ वातावरण तापले होते. या आंदोलनामुळे सुमारे १५ मिनिटे रेल्वेगाडी पुढे धावू शकली नव्हती.सकाळी जलदगतीची रेल्वे गाडी धीम्यागतीच्य ट्रॅकवर आली होती. ही लोकल नियोजित वेळेपेक्षा उशिराने आल्याने फलाटावर प्रवाशांची गर्दी इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणावर वाढली होती. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
फलाटावर लोकल आल्यावर गर्दीमुळे काही प्रवाशांना लोकलच्या आत जाणे शक्य झाले नाही.त्यामुळे संतप्त प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केले.तर काही महिला मोटरमेनच्या केबिनमध्ये शिरल्याने आणखीन गोंधळ झाल्याची माहिती मिळाली.आंदोलनकर्त्याना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काही वेळाने रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली.