कळवा रुग्णालयात एका रात्रीत तब्बल १७ रुग्ण दगावले

 ठाणे:  ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १२ तासात १७ रुग्णांचा मृत्यू झाला असून यामुळे सरकारही हादरले आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल येताच दोषींवर कारवाई केली जाईल. या प्रकरणी चौकशी समिती तयार करण्यात आली असून चौकशी अहवाल मागवला आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे.

शनिवार रात्रीपासून ते रविवार सकाळपर्यंत रुग्णालयात एकामागून एक अशा १७ लोकांचा मृत्यू झाल्याने ठाणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कळव्यातील रुग्णालयात ही घटना घडली असून या प्रकरणांमुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मृतांमध्ये वयोवृद्ध पुरुष आणि महिलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. याशिवाय काही रुग्णांना शेवटच्या क्षणी अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याचा आरोप दोनच दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला होता.

दोन दिवसांपूर्वी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सहा रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे सांगत रुग्णांच्या नातेवाईकांनी जोरदार आंदोलन केले होते. या घटनेवर स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील संताप व्यक्त केला होता. परंतु आता या घटनेच्या दोनच दिवसांनंतर आणखी १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मृत पावलेल्या १३ रुग्णांवर अतिदक्षता विभागात तर चार रुग्णांवर सामान्य कक्षात उपचार सुरू होते. उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आलेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे वृद्ध होते, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे. 

आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले, ठाणे रुग्णालयातील घटनेबाबत मी सातत्याने माहिती घेत आहे. मी स्वतः तिथल्या आयुक्तांशी बोलत आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत हे हॉस्पिटल येते. ही घटना कशामुळे घडली, याचा अहवालएक ते दोन दिवसांत येईल. १३ जणांचा मृत्यू हा आयसीयूमध्ये झाला आहे. तर इतर ४ हे जनरल वार्डमधील आहेत. याबाबत डीनचे दुर्लक्ष झाले का हे पाहावे लागेल, पण अतिशय दुर्दैवी घटना असल्याचे त्यांनी म्हटले.

Post a Comment

Previous Post Next Post