शिक्षक दिनानिमित्त पालिकेच्या शाळेतील शिक्षकांचा सन्मान

 

डोंबिवली ( शंकर जाधव ) : महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फंत आचार्य प्र.के.अत्रे रंगमंदिर, कल्याण (पश्चिम) येथे शिक्षक दिनानिमित्त पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी उपस्थित शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी उपायुक्त अर्चना दिवे, धैर्यशील जाधव, अवधुत तावडे, विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव, प्रशासन अधिकारी रंजना राव, शिक्षण अधिकारी विजय सरकटे व्यासपीठावर उपस्थित होते.

आपला विद्यार्थी सर्वोच्च पदाला पोहचणे हाच खरा शिक्षकाला मिळालेला पुरस्कार आहे, असे माहिती व जनसंपर्क विभागाचे विभागप्रमुख संजय जाधव यांनी यावेळी सांगितले. तर शिक्षक हा भारतीय संस्कृतीवर दुरगामी परिणामी करणारा घटक असून शिक्षक हाच खरा शिक्षणाच्या पायाचा, मैलाचा, शिखराचा दगड आहे, असे प्रतिपादन उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी आपल्या भाषणातून केले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी शुभेच्छा संदेशाद्वारे सर्व उपस्थित शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

    या कार्यक्रमात महापालिकेच्या व खाजगी अनुदानित प्रार्थमिक शाळांमध्ये उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्य करणा-या ६ शिक्षकांना, २ शाळांना अनुक्रमे आदर्श शिक्षक/आदर्श शाळा पुरस्कार इयत्ता ४थी व इयत्ता ७वी च्या प्रत्येकी एका विद्यार्थ्याला आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या एका विद्यार्थ्यास व ६ दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांनी मिळविलेल्या विशेष नैपुण्याबाबत उपस्थित मान्यवर अधिका-यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी माजी शिक्षणाधिकारी रविंद्र जगदाळे यांनी सांभाळली तर आभार प्रदर्शन शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी केले .



Post a Comment

Previous Post Next Post