मुंबईत झिकाचा दुसरा रुग्ण आढळला




मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काही दिवसांपूर्वीच चेंबूरमध्ये झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर आता कुर्ला परिसरात झिकाचा दुसरा रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 झिका बाधित मुलीचे वय १५ वर्ष असून तिला ताप आणि डोकेदुखीचा त्रास होत होता. खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर मुलीला पुढील उपचारासाठी सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या झिका बाधित मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. या रोगावर कोणतीही लस किंवा औषध नाही. ताप, पुरळ, डोकेदुखी, सांधेदुखी, डोळे लाल होणे, स्नायू दुखणे ही या रोगाची लक्षणे आढळतात.

झिका बाधित मुलीच्या शरीरात एडीज डासोत्पत्ती आढळली आहे. डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत ही बाब समोर आली आहे. त्यानंतर आता कुर्ला परिसरात डासनियंत्रण उपाययोजना राबवण्यात येत असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. झिका हा सौम्य आजार असून तो संक्रमित एडिस डासांमुळे पसरतो. ज्या लोकांना पूर्वीचे गंभीर आजार आहे, त्यांना झिकाचे संक्रमण होण्याची शक्यता जास्त असते.

पालिकेचे आवाहन
झिका व्हायरस हा संसर्गजन्य आजार असला तरी लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पालिकेने केले आहे. 'झिका विषाणूची लागण झालेले लोक स्वत:च बरे होतात. ८० टक्के लोकांमध्ये याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. या रुग्णाची माहिती मिळताच आम्ही तत्काळ रुग्णाच्या घराच्या परिसरातील इतर घरांमध्ये सर्वेक्षण केले परंतु आम्हाला इतर कोणतेही रुग्ण आढळले नसल्याचे मुंबई महापालिकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post