नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा केली आहे. या अधिवेशनचा पहिला दिवस जुन्या अधिवेशनाच्या इमारतीत होणार असून मात्र दुसर्या दिवशी अधिवेशन नव्या इमारतीत होणार आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अधिवेशन संसदेच्या नव्या इमारतीत शिफ्ट केले जाणार आहे. नव्या इमारतीतच हे विशेष अधिवेशन २२ सप्टेंबरपर्यंत चालेल.
२८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करून ते देशवासियांना समर्पित केले होते. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेले नवीन संसद भवन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ९७३ कोटी रुपये खर्चून बांधलेली ही इमारत २९ महिन्यांत पूर्ण करण्यात आली.
पंतप्रधान मोदींनी विशेष अधिवेशनाची घोषणा तर केली आहे, मात्र अधिवेशनाचा अजेंडा गुलदस्त्यात ठेवला आहे. विरोधी इंडिया आघाडीने मंगळवारी केंद्र सरकारच्या संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा सार्वजनिक करण्याची मागणी केली होती. विरोधकांनी म्हटले आहे, त्यांना एक सकारात्मक अधिवेशनाची आशा आहे. विरोधकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की, सरकार विशेष अधिवेशनात महागाई व बेरोजगारी सारख्या मुद्द्यांवर चर्चा करेल.

