रवींद्र चव्हाणांनी केडीएमसी आयुक्तांना सुनावले खडे बोल
डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण - डोंबिवली महानगरपालिका उत्तम रस्ते हे नागरिकांना स्वप्न दाखविल्याची चर्चा सुरू आहे.त्यात पालिका प्रशासन पावसाळ्यात खड्डे बुजवत असली तरी त्याच रस्त्यांवर खड्डे पडत आल्याने नागरिकांचा प्रशासनावर संताप वाढत चालला आहे.यावर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी 'कधीतरी डोंबिवली शहरात फेरफटका मारा' अशा शब्दात पालिका आयुक्तांना खडे बोल सुनावले आहे. यावर आयुक्तांनी सोमवार पासून शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली जाईल असे आश्वासन दिल्याने मंत्रीमहोदयांच्या कानउघडणीने आयुक्त शहरातील नागरिकांची खड्डेमय रस्त्यातून सुटका करतील का हे येत्या नजीकच्या दिवसात दिसून येईल. तोपर्यत नागरिकांना जीवघेण्या खड्डेमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागणार आहे.
गणेशोत्सव जवळ आला असताना रस्त्यातील खड्डयांचे विघ्न दूर करा अशी मागणी डोंबिवलीकर करत आहेत.डोंबिवली शहरातील अनेक रस्ते खड्ड्यात आहेत की खड्ड्यात रस्ता आहे अशी स्थिती दिसते.2020 पासून पालिकेत प्रशासकीय राजवट असून पालिका आयुक्तांना शहरातील रस्त्यांची अवस्था माहीत नसावे याचे आश्चर्य नागरिकांना वाटते.अधिकाऱ्यांना निर्देश देऊन त्याची अंमलबजावणी होतेय की नाही याकडेही आयुक्तांनी पाहणे आवश्यक आहे. माजी लोकप्रतिनिधी मात्र सत्ता नसल्याने पालिकेवर बोट दाखवितात.
यावर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांना खडे बोल सुनावले आहे.'कधीतरी डोंबिवली शहरात फेरफटका मारा' असे आयुक्तांना सांगितल्याचे मंत्री चव्हाण यांनी डोंबिवलीत एका पत्रकार परिषदेत सांगितले. शहरातील रस्त्यात खड्डे पडल्याने वाहनचालकांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.ही वस्तुस्थिती माहीत असूनही प्रशासन मात्र तात्पुरते स्वरूपात खड्डे बुजवितात दिसतात. मात्र उत्तम रस्ता बनविणारा ठेकेदार अद्याप प्रशासनाला मिळू नये का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी पालिका आयुक्तांना सूनावल्याने आतातरी डोंबिवलीतील रस्त्यातील खड्ड्यांचे विघ्न दूर होईल का हे लवकरच दिसून येईल.
