आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर
ठाणे: कोरोनाच्या पूर्वीच्या व्हेरिएंटपेक्षा वेगाने पसरणाऱ्या या Covid JN.1 या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण ठाणे कळव्यातील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आढळल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
केरळ अन्य राज्यानंतर आता महाराष्ट्रातही कोरोनाचे पुनरागमन झाले आहे. मंगळवारी सायंकाळी ठाणे महापालिका हद्दीत एका १९ वर्षीय तरुणीला कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लागण झाल्याचे समोर आले आहे. तरुणीचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने रुग्णालयात प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. तिच्यावर ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातच या तरुणीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णाचे नमुने पुणे प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत, त्यानंतरच हा कोणता व्हेरिएंट याची माहिती समोर येईल अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध माळगांवकर यांनी दिली.
कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन-१ ने पुन्हा एकदा जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. केरळमध्ये एकाच दिवशी जेएन.१ या सब व्हेरिअंटचे ११५ रुग्ण आढळल्याने केंद्र सरकारने राज्यांसाठी मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. या व्हेरिएंटने केरळमध्ये पाच जणांचा बळी घेतला आहे.
