कोल्हापूर \ शेखर धोंगडे : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांना व अपूर्ण शिक्षण पूर्ण करणाऱ्यांना शिक्षण घेण्याची संधी देत आले आहे.समाजातील विविध घटकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी केंद्र सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलगा – वडील, मुलगा – आई, भाऊ – बहिण, भाऊ – भाऊ, बहिणी- बहिणी, मुलगी – वडील आदींनी एकाच वेळी शिक्षण घेतले आहे. आता या यादीत पती-पत्नी यांचाही समावेश झाला आहे.
मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील हिटणी येथील माजी सैनिक बसगोंडा तायगोंडा पाटील (वय ६०) यांनी आपल्या पत्नी स्मिता यांच्यासह राहिलेले अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्याचा चंग बांधून तो पूर्णत्वाकडे नेण्यासाठी दूर शिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र अंतर्गत श्री.शहाजी छत्रपती महाविद्यालय येथे बी.ए.भाग १ मध्ये प्रवेश घेतला आहे.विशेष म्हणजे दोघांनी ही वेगवेगळे ऐच्छीक विषय ठेवलेले आहेत. त्यांचा या मागचा महत्वपूर्ण दृष्टीकोन आहे की,वेगवेगळ्या विषयाचे ज्ञान आपणास मिळाले पाहिजे. त्याचा उपयोग कुटुंबातील सर्वाना झाला पाहिजे. ज्ञान हे जीवनाला आकार देते.त्यातून सांस्कृतिक ,वैचारिक जडणघडण होते.माणूस हा आजन्म विद्यार्थी असतो.त्यामुळे ज्ञानाची भूक भागविण्यासाठी प्रत्येकांनी शिक्षण घेतले पाहिजे.वाचनाची आवड जोपासली पाहिजे.तसेच देशाप्रती योगदान देणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.असे मत पाटील दांपत्यानी व्यक्त केले.
बसगोंडा पाटील यांनी गावातच प्राथमिक शिक्षण घेऊन माध्यमिकचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण करून शिवराज महाविद्यालयात ज्युनिअरचे शिक्षण पूर्ण केले.त्या नंतर सैन्य दलात भरती झाल्यानंतर त्यांनी लखनौ,वेलिंग्टन,गुवाहाटी,कलकत्ता, आग्रा, पुणे, श्रीनगर, कामठी (नागपूर), दिल्ली, इलाहाबाद (प्रयागराज) येथे एकूण २० वर्षे आर्मी डेंटल कोर (Army Dental Corps ) मध्ये डेंटल हायजिनिस्ट म्हणून कामकाज पाहिले आहे.त्याच बरोबर त्यांच्या पत्नी स्मिता पाटील यांनी पुणे येथून डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले असून नवी दिल्ली येथे दोन वर्षे राज्य सभेच्या संसदीय अधिवेशन कार्यकाळात युगपत भाषांतरणं सलाहकार म्हणून कामकाज पाहिलेले आहे.त्याच बरोबर बेळगाव येथे रेडीओ स्टेशन प्रोग्रामर म्हणून १० वर्षे कामकाज पहिले आहे.मराठी,हिंदी,कोकणी भाषेसाठी त्यांनी प्रोग्रामर म्हणून ही रेडीओ स्टेशन मध्ये कामकाज पाहिले आहे.त्यांनी ज्या - ज्या ठिकाणी सेवा बजावली आहे.तेथे नाट्य,साहित्य आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे.
पाटील दांपत्याने बी.ए.भाग १ साठी प्रवेश घेतल्याबद्दल संचालक डॉ.के.बी.पाटील,उपकुलसचिव श्री.व्ही.बी.शिंदे,समन्वयक डॉ.चांगदेव बंडगर,सहा.प्राध्यापक डॉ.सचिन भोसले, डॉ. नितीन रणदिवे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.