दिवा, (आरती मुळीक परब) - खेड तालुका कोकण रहिवाशी मंच, दिवा शहर या संस्थेच्या वतीने माँसाहेब जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले वाडीबेलदार गावचे सुपुत्र ह. भ. प. लक्ष्मण महाराज पवार, तसेच खेड तालुका रहिवाशी मंच मुंबईचे पदाधिकारी रघुनाथ निकम, संस्थेचे प्रमुख सल्लागार मंगेश शेलार यांच्या हस्ते माँसाहेब जिजाऊ व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून उपस्थित सर्वच मायमाउलींच्या वतीने माँसाहेब जिजाऊंना ओवाळण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक गंगाबाई केशव उतेकर, ललिता निकम, नथुराम कदम या मातापित्यांचे आशीर्वाद घेऊन कार्यक्रमातील मुलांच्या वकृत्व स्पर्धेला सुरवात करण्यात आली. वकृत्व स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. २१ मुलांनी आपली कला या ठिकाणी सादर केली. त्यातील दहा मुलींनी राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा केली होती. अतिशय उत्साहात, आनंदात जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य प्रवक्ता प्रवीण उतेकर व सहसचिव विशाल देवळे या दोघांनी केले. या कार्यक्रमासाठी ज्या ज्या सहकारी बांधवांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला अशा सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
