ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोदी नको चे बॅनर

 

उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांचे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बॅनर

ठाणे: शुक्रवारी मोदींचा मुंबई दौरा झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मोदी नकोच आणि मोदींसोबतचे ढोंगी पण नको अशा आशयाचे बॅनर लावून प्रधानमंत्री मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी कोपरी पाचपखाडीत विधानसभा मतदारसंघात मोदी नकोच अशा आशयाचे बॅनर लावले असून या बॅनरची ठाणेकरांमध्ये चर्चा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकीकडे मोदींचे भरभरून कौतुक करत असताना त्यांच्याच मतदारसंघात मोदी नकोच आणि मोदींसोबतचे ढोंगी पण नको असे म्हणत मोदींसह एकनाथ शिंदेंवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय घाडीगावकर यांनी हल्लाबोल केला आहे.

याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी म्हटले की, देशात प्रचंड महागाई वाढवून सामान्य जनतेला वेठीस धरणारे मोदी २०२४ ला नकोच अशी जनतेची भावना आहे. आणि जे लोक पळपुटेपणा करून शिवसेना चोरीच्या षड्यंत्रात सामील होऊन मातोश्री आणि ठाकरे कुटुंबावर आरोप करून बाहेर पडले आहेत ते ढोंगीपण २०२४ ला नको अशी जनतेची भावना असल्याचे संजय घाडीगावकर यांनी  म्हटले आहे.

मोदींनी कितीही आश्वासन दिली तरी सामान्य जनतेची भावना ही मोदी नको अशा स्वरूपाची असून देशात लोकशाही वाचवण्यासाठी मोदींचा पराभव सर्वसामान्य जनता करेल, असा विश्वास घाडीगावकर यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post