नवी दिल्ली : 'मैं अटल हूं' चित्रपटामुळे सध्या चर्चेत आलेले बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी निवडणूक आयोगाचे आयकॉन पद सोडले आहे. लोकसभा निवडणूक २०२४ पूर्वी पंकज त्रिपाठी यांनी निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय आयकॉन पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
आपल्या आगामी 'मैं हूं अटल' या चित्रपटामुळे व्यस्त असल्यामुळे पंकज त्रिपाठी यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या चित्रपटात ते ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत ते दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक रवी जाधव यांनी केले असून हा चित्रपट १९ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.
ऑक्टोबर २०२२ मध्ये पंकज त्रिपाठी यांची निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय आयकॉनपदी नियुक्ती करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने आपल्या एक्स खात्यावर (Twitter) एक पोस्ट लिहिली आहे. आपल्या आगामी चित्रपटात एका राजकीय नेत्याची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी MOU च्या अटीनुसार स्वेच्छेने निवडणूक आयोगाच्या नॅशनल आयकॉनपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
२०२२ पासून मतदार जनजागृती आणि SVEEP मध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचे योगदान आहे. या योगदानाबद्दल निवडणूक आयोगाने आभार व्यक्त केले आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठी म्हणाले होते की, ते ज्या राज्यातून येतात, तेथे प्रत्येकजण राजकारणी असतो. दरम्यान, पंकज त्रिपाठी हे बिहारमध्ये आपल्या महाविद्यालयीन काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (एबीव्हीपी) सदस्य होते.

.jpeg)