पालघर: फूल बाजारात परजिल्ह्यातील फूलउत्पादकांची फूलं येत असल्यामुळे पालघर जिल्ह्यातील फूलउत्पादकाला मोठा बसत आहे. त्याचबरोबर फुलांची आवक वाढल्याने फुलांचे भाव घसरल्याने चित्र पहावयास मिळत आहे. सध्या झेंडूच्या फुलांना फक्त १० ते १५ रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. त्यामुळे येथील झेंडूच्या फुलांची शेती करणारे शेतकरी संकटात सापडला आहे.
पालघर जिल्ह्यात शेती उत्पादनामध्ये भातपिकाला विशेष प्राधान्य दिल्यानंतर आता फुलांच्या शेतीकडे शेतकरी वर्गाचा कल वाढल्याने झेंडूच्या फुलांचे भाव एकदम गडगडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पालघर जिल्ह्यातील फूलउत्पादक मोठ्या प्रमाणात कल्याण आणि दादर या दोन ठिकाणी आपला माल विकण्यासाठी येत असतात. मात्र या बाजार पेठेत सध्या परजिल्ह्यातील आणि परराज्यातील फूलं, विक्रीसाठी येत आहेत. त्याच्या फटका पालघर जिह्यातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला असून झेंडूच्या फुलांचा भाव गडगडला आहे.
भातपीक घेतल्यानंतर अनेक गावांमध्ये फुलशेती केली जाते. यामध्ये प्रामुख्याने झेंडूच्या लाल-पिवळ्या फुलांची सर्वाधिक लागवड केली जाते. सध्या पालघर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये झेंडूच्या फुलांची शेती बहरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. झेंडूच्या लाल-पिवळ्या रंगामुळे डोळ्यांना आनंद मिळत असला तरी मात्र लाल-पिवळ्या फुलांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे
झेंडूच्या फुलांना साधारण ३५ ते ४० रुपये किलो भाव मिळाल्यास नफा मिळण्याची शक्यता असते. जर भाव ५० रुपयांपर्यंत किंवा त्यावरती गेल्यास चांगला नफा शेतकऱ्यांना मिळत असतो.
.jpeg)
