दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे महिलांना आवाहन
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत विविध पक्ष आपापल्या परीने जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान मोदी मोदी परिवार, मोदी की गॅरंटीच्या माध्यमातून आपली दावेदारी मजबूत करत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र पंतप्रधानांच्या भूलथापांपासून आपल्या पतींना दूर करण्याचा मंत्र दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिलांना आवाहन करत पतीने जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा ‘जप’ केल्यास त्यांना जेवण देऊ नका, असे म्हटले आहे. त्यांच्या या अजब गजब आवाहनाची सध्या चर्चा रंगली आहे.
दिल्लीतील टाऊनहॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला सन्मान समारोह कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री यांनी महिलांना आवाहन करत अनेक पुरुष पंतप्रधान मोदींच्या नावाचा जप करतात. परंतु तुम्हाला त्यांना वठणीवर आणावे लागेल. जर तुमच्या पतीने मोदींचे नाव घेतले तर त्यांना सांगा की तुम्ही त्यांना जेवण देणार नाही असे सांगण्यास सांगितले.
अरविंद केजरीवाल यांनी महिलांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना 'आप'ला पाठिंबा देण्याची शपथ दिली. यावेळी भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलांना आपकडे वळविण्याचा सल्ला देत तुमचा केजरीवाल भाऊ तुमच्या पाठीशी सदैव उभा आहे. त्यामुळे त्याला पाठिंबा देऊन बळ देण्याचे आवाहन करण्यास पक्षातील महिलांना सांगितले. त्याच्याबरोबर घरच्यांना सांगा की मी त्यांना वीज मोफत दिली आहे. तर सार्वजनिक वाहतूक सेवा देखील मोफत केली आहे. आता मी महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. भाजपने तुमच्यासाठी काय केले आहे? मग भाजपला मत का द्यावे? यावेळी फक्त आपला मत द्या, " असे देखील सांगण्यास सांगितले.
भाजपने महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली आतापर्यंत तुमची फसवणूक करण्यात आली आहे. "पक्ष एखाद्या महिलेला काही पद देतात आणि म्हणतात की महिलांचे सक्षमीकरण झाले आहे. महिलांना पदे मिळू नयेत यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे सांगून आप सरकारची 'मुख्यमंत्री महिला सन्मान ही नवी योजना' खऱ्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण करणारी असल्यावर शिक्कामोर्तब केला. महिलांच्या हातात जेव्हा पैसा असेल तेव्हा त्यांचे खऱ्या अर्थाने सशक्तीकरण होईल. प्रत्येक महिलेला आता दरमहा १००० रुपये मिळणार आहे. यामुळे त्यांना फायदा होणार आहे. ही योजना संपूर्ण जगात "सर्वात मोठा महिला सक्षमीकरण कार्यक्रम असेल अशी घोषणा देखील केजरीवाल यांनी केली.