IND vs ENG TEST : अश्विनचा १०० व्या कसोटीत नवा विक्रम

Maharashtra WebNews
0

 


कसोटीत सर्वाधिक वेळा एका डावात पाच विकेट घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला

धर्मशाला : भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत इतिहास रचला. त्याने इंग्लिश संघाच्या दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या. अश्विनने बेन डकेटला (२) बाद करून इंग्लंडला पहिला धक्का दिला. यानंतर त्याने जॅक क्रोली (०) आणि त्यानंतर ऑली पोप (१९) यांना बाद करून इंग्लंडच्या टॉप ऑर्डरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर त्याने बेन स्टोक्स आणि बेन फॉक्सला बाद केले आणि डावात पाच बळी पूर्ण केले. आतापर्यंत कसोटीत त्याने ३६ वेळा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी इतिहासात सर्वाधिक वेळा एका डावात पाच विकेट घेणारा तो भारताचा गोलंदाज ठरला आहे. या प्रकरणात त्याने अनिल कुंबळेला मागे सोडले. कुंबळेने ३५ वेळा असे केले.

त्याचबरोबर अश्विनने एका डावात सर्वाधिक वेळा पाच बळी घेण्याच्या बाबतीत न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज सर रिचर्ड हॅडलीची बरोबरी केली. आता शेन वॉर्न (३७ वेळा) आणि श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन (६७ वेळा) अश्विनपेक्षा एका डावात पाच विकेट घेण्याच्या बाबतीत पुढे आहेत. अश्विनने पहिल्या डावात चार विकेट घेतल्या होत्या आणि या कसोटीत त्याने एकूण नऊ बळी घेतले आहेत. एवढेच नाही तर २०१९ मध्ये सुरू झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये सर्वाधिक वेळा एका डावात पाच विकेट घेण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनच्या विक्रमाचीही बरोबरी केली. लियोननेेे १० वेळा असे केले आहे आणि अश्विनने आता १० वेळा डब्ल्यूटीसीमध्ये एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत.

याशिवाय, अश्र्विनने आतापर्यंत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये १७४ बळी घेतले आहेत आणि यामध्ये सर्वाधिक बळींच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. अश्विनने पॅट कमिन्सला मागे सोडले, ज्यांच्या नावावर १७२ विकेट आहेत. लिऑनने डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावावर १८४ विकेट आहेत. अश्विनने १०० वी कसोटी खास बनवत अनेक विक्रम केले आहेत. अश्विनने आतापर्यंत कसोटीत ५१६ विकेट्स घेतल्या आहेत.

 यासोबतच अश्विनच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५६ आणि टी-२० मध्ये ७२ विकेट्स आहेत. याआधी जेम्स अँडरसनने आपल्या कसोटी कारकिर्दीत ७०० विकेट्स पूर्ण केल्या होत्या. हा टप्पा गाठणारा तो जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला. त्याच वेळी, सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांमध्ये तो मुरलीधरन (८००) आणि वॉर्न (७०८) नंतर तिसऱ्या स्थानावर आहे.



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)