पंजाब : लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळी टिकीट मिळण्यासाठी धडपड करत आहेत. यामध्ये काँग्रेसचे बरेचसे मंत्री भाजपमध्ये दाखल होत आहे. लुधियानाचे खासदार रवनीत बिट्टू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी दिल्लीत पक्षात प्रवेश केला. बिट्टू हा पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचा नातू आहे. ते दोन वेळा लुधियानामधून खासदार झाले आहेत. याशिवाय त्यांनी श्री आनंदपूर साहिबमधून खासदारकीची निवडणूकही जिंकली आहे. त्यांना लुधियानामधून पक्षाचे तिकीट मिळू शकते.
बिट्टू यांनी २००९ मध्ये श्री आनंदपूर साहिबमधून पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये लुधियाना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून ते संसदेत पोहोचले. २०१९ मध्ये बिट्टूने सिमरजीत सिंह बैंस यांचा पराभव केला. ते अतिशय बोलका नेता मानले जातात. याआधी पटियालाच्या काँग्रेस खासदार प्रनीत कौर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पटियाला मतदारसंघातून त्या पक्षाच्या तिकीटाच्या दावेदार आहेत.
नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी बिट्टू यांचा पक्षात समावेश केला. भाजपमध्ये समावेश केल्याबद्दल बिट्टू यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले आहेत. यावेळी आपल्या भाषणादरम्यान बिट्टू म्हणाले - "माझे अमित शहा यांच्याशी खूप वैयक्तिक संबंध आहेत. मी पंजाबची अत्यंत वाईट परिस्थिती पाहिली आहे. पंजाबमध्ये निर्माण झालेली फूट भरून काढण्याचा ते प्रयत्न करतील." ते पुढे म्हणाले- "भविष्यातही मोदीजींचे सरकार येणार आहे. आम्ही पंजाबच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचे काम करणर असल्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, बिट्टू भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना लुधियाना मतदारसंघातून भाजपचे तिकीट मिळेल, अशी अटकळ बांधली जात आहे, तर पंजाब काँग्रेसला त्यांच्या विद्यमान खासदाराच्या वागणुकीमुळे मोठा धक्का बसला आहे. बिट्टू काँग्रेसच्या तिकिटावर लुधियाना मतदारसंघातून दोनदा आणि आनंदपूर साहिब मतदारसंघातून एकदा खासदार निवडून आले होते.