आचारसंहिता जाहीर झाल्यापासून अवघ्या ७२ तासात कारवाई
रायगड : (Raigad) रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यापासून अवघ्या ७२ तासांच्या आत पोलीस, राज्य उत्पादन शुल्क तसेच अमली पदार्थविरोधी पथकाने जिल्ह्यात केलेल्या कारवाईत १ कोटी १९ लाख रुपयांचा अमली पदार्थाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
रायगड जिल्ह्यामध्ये ३२-रायगड लोकसभा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. दि. १६ मार्चपासून आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचार संहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन, राज्य पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, जीएसटी विभाग, अंमली पदार्थ विरोधी विभाग, पोस्ट विभाग, इंडियन कोस्ट गार्ड, एअरपोर्ट ॲथोरिटी या विविध यंत्रणांच्या माध्यमातून अवैध दारू विक्री, रोख रकमेची हाताळणी याकडे विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती इलेक्शन सिझर मॅनेजमेंट सिस्टिम (ESMS) मध्ये नोंदविण्यात आली आहे.