जेसलमेर: हवाई दलाचे लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) तेजस आज जेसलमेरजवळ ऑपरेशनल ट्रेनिंग फ्लाइट दरम्यान क्रॅश झाले. मात्र, या अपघातातून पायलटला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सराव सुरू असताना भील वसतिगृहाजवळ विमान कोसळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.
या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना भारतीय हवाई दलाने एका निवेदनात म्हटले आहे की, “भारतीय वायुसेनेच्या एका तेजस विमानाचा आज जैसलमेर येथे ऑपरेशनल ट्रेनिंग सोर्टी दरम्यान अपघात झाला. पायलट सुखरूप बाहेर पडला. अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन करण्यात आल्याचे म्हटले आहे.
२३ वर्षांपूर्वी पहिल्यांदा उड्डाण केल्यानंतर स्वदेशी जेटचा हा पहिला अपघात आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, पश्चिम बंगालमध्ये प्रशिक्षणादरम्यान IAF च्या हॉक ट्रेनर विमानाचा अपघात झाला. कलाईकुंडा एअरफोर्स स्टेशनजवळ नागरी भागात विमान कोसळले. मात्र, यात कोणतीही जीवितहानी किंवा नागरी मालमत्तेचे नुकसान झाले नाही. दोन्ही पायलट सुखरूप बाहेर पडले.