- २० पैकी ५ बसेस दाखल
- केंद्र शासनाकडून १०० ई-बस मंजूर
- बस डेपोच्या कामासाठी २३ कोटीचा निधी
उल्हासनगर: उल्हासनगर महानगरपालिकची स्वतःची बससेवा असावी असा आयुक्त अजीज शेख यांचा मानस होता. त्यासाठी त्यांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असताना केंद्र शासनाची प्रधानमंत्री ई-बस योजना सुरू झाली आणि या योजनेअंतर्गत उल्हासनगर महानगरपालिकेस १०० ई-बसेस पालिकेच्या ताफ्यात जमा होणार आहेत. याप्रसंगी पालिकेने सुरू केलेल्या परिवहन प्रक्रियेतून २० बसेसपैकी ५ बसेस उल्हासनगरमध्ये दाखल झाल्या असून लवकरच स्वतःच्या बसेस रस्त्यावर धावताना दिसणार आहेत.
आयुक्त अजीज शेख यांनी दिलेल्या निर्देशानुसार पालिकेने बसेसबाबत निविदा प्रसिद्ध करून पिनॅकल मोबिलिटी पुणे या कंपनीकडून २० बसेसची निवड केली. या कंपनीच्या माध्यमातून ९ मीटरच्या १० नॉन एसी आणि १२ मीटरच्या १० एसी बसेस उपलब्ध होणार आहेत. त्यापैकी सध्याला ५ बसेस महानगरपालिकेला प्राप्त झाल्या आहेत. या बस शहरात दाखल झाल्यानंतर सध्या बस डेपो निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
बससेवा सुरू करण्यासाठी चार्जिंग स्टेशन व डेपो निर्माण करण्यात आलेला आहे. कंडक्टर यांना तिकीट काढण्यासाठी येस बँक व ओमनीफिसेंट टेक्नॉलॉजी प्रा. लि.मार्फत मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये ऑनलाईन तिकिट, मोबाईल ॲप, स्मार्ट कार्ड, रोख व युपीआय क्युआर इत्यादीची सुविधा आहे. शहरामध्ये बस थांबे बनवण्याकरिता स्वतंत्र “प्रोॲक्टीव इन ॲन्ड आऊट ॲडव्हरटाझींग प्रा. लि., मुंबई” या कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच महानगरपालिकेची ही प्रक्रिया सुरू असताना केंद्र शासनाची प्रधान मंत्री ई-बस योजना सुरू झाली आणि या योजनेअंतर्गत उल्हासनगर महानगरपालिकेस १०० ई - बसेस उपलब्ध करून देण्यास मंजुरी प्राप्त झालेली आहे.
महानगरपालिकेच्या बस डेपोचे बांधकाम आणि चार्जिंग स्टेशनचे बांधकाम यासाठी २३ कोटी इतका भरघोस निधी मंजूर करण्यास मान्यता देण्यात आलेली असून त्याबाबतची निविदा प्रक्रिया सुद्धा महानगरपालिकेने सुरू केलेली आहे.