नाशिक जिल्ह्यात उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण

 


नाशिक: राज्यात सगळीकडे उष्णतेची लाट सुरू असताना नाशिक जिल्ह्यात तापमानाचा पारा ४०ते ४३ अंशांवर पोहोचला असल्याने उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या उष्णतेमुळे आजारपण देखील वाढत असल्यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एक मार्चपासून ते आतापर्यंत २३ रुग्णांची नोंद नाशिक जिल्ह्यात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व ११२ प्राथमिक आरोग्य केंद्रांत स्वतंत्र उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली. 

उन्हाचा पारा वाढत असल्याने आगामी काळात रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याचा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे. मार्चच्या मध्यावर्तीपासूनच उष्णतेची लाट वाढत आहे. जिल्ह्याचा पारा हा ४० अंशांच्या पुढे गेला. मार्चपेक्षा एप्रिलमध्ये उन्हाचा तडाखा वाढला होता. दुष्काळी परिस्थिती असल्याने उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केली होती. राज्यात १ मार्च ते ६ मे या कालावधीत उष्माघाताच्या २०२ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक २३ रुग्ण नाशिक जिल्ह्यातील आहेत.

 राज्यात यंदा उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद कोठेही झालेली नाही. गेल्या वर्षी राज्यात १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत उष्माघातामुळे तब्बल २२ जणांचा मृत्यू झाला होता.

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक २३ उष्माघाताचे रुग्ण आहेत. जिल्ह्यात यंदा केवळ ६९ टक्के पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गडद आहे. यात जिल्ह्याचा पारा हा ४० अंशांच्या पुढे गेला. प्रामुख्याने मालेगाव, येवला व नांदगाव या दुष्काळी तालुक्यांमध्ये उष्मघाताची लाट आहे. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सर्वाधिक सात, तर मालेगावात पाच रुग्ण सापडले आहेत.

सध्या नाशिकमध्ये अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी या पावसामुळे रोगराईचे प्रमाण देखील वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post