मुंबई: मुंबईसह उपनरात सोमवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारपासून मुंबई आणि मुंबई उपनगरात ढगाळ वातावरण झालं होतं. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावर मोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हे होर्डिंग कोसळले.
होर्डिंगखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमध्ये ७ जण जखमी झाले आहेत. जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी धाव घेतली आहे. सध्या घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. हे होर्डिंग लोहमार्ग पोलीस वसाहतीच्या हद्दीत असून महाराष्ट्र राज्य पोलीस वेलफेअर अससोसिएशनच्या नावे जागा आहे. त्या होर्डिंगला लायसन्स नसून मुंबई महापालिकेने नोटीस बजावून ऑब्जेक्शन घेतले होते. तसंच होर्डिंग दिसावं म्हणून याच हद्दीतील झाडावर विषप्रयोग केल्याने मुंबई महापालिकेने एफआयआरही केल्याचं स्पष्ट केलं आहे. अनधिकृतपणे होर्डिंग लावल्याचाही आरोप मुंबई महापालिकेने केला आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी घाटकोपरमधील घटनास्थळाची पाहणी केली.
चार होर्डिंग उभारण्यात आले होते. त्यापैकी एक पडले. आतापर्यंत ३५ जणांना बाहेर काढले असून एनडीआरएफची टीमदेखील दाखल झाल्याची मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी माहिती दिली. ४० बाय ४० ची होर्डिंग साईज असावी. मात्र १०० बाय १२० असं महाकाय होर्डिंग उभारण्यात आलं. याआधीही रेल्वे पोलीस प्रशासनाला नोटीस बजावण्यात आली होती. या घटनेशी संबंधित सर्वांची चौकशी करून एफआयआर करणार असल्याची माहिती मुंबई महापालिका भूषण गगराणी यांनी दिली. चारपैकी एक होर्डिंग पडलं असून तीन होर्डिंग तात्काळ काढण्याचे आदेश आयुक्तानी दिले आहेत.
