दिवा, (आरती मुळीक परब) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील शीळफाटा जंक्शन येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे ठाणे, पनवेल, कल्याण तसेच उपनगरात जाणाऱ्या वाहन चालकांना जलद गतीने वाहतूक करता येत आहे. तरी त्या उड्डाण पुलावरील दिवे गेल्या आठवड्यापासून बंद असल्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास होत आहे.
या शिळच्या उड्डाण पुलामुळे वाहन चालकांच्या वेळेमध्ये आणि इंधनाचीही बचत होत असली तरी गेल्या आठवड्यापासून तेथील सहा मार्गीकांवरील सर्व दिवे हे बंद असल्याने वाहन चालकांना गाडी चालवताना वेग कमी करून हा उड्डाणपूल ओलांडावा लागतो आहे.
गेल्या जानेवारी महिन्यात या उड्डाण पुलाच्या तीन मार्गिका सुरू करण्यात आल्या होत्या तर दोन दिवसांपूर्वी त्या शीळच्या उरलेल्या तीन मार्गिकाही सुरू करण्यात आल्या. पण या सहा पदरी उड्डाणपूलावरील सर्व दिवे हे गेल्या आठवड्यापासून बंद असल्याने वाहन चालकांना वेग मर्यादित ठेऊन पूल ओलांडावा लागत आहे. वेग मर्यादित न ठेवता गाडी त्या उड्डाण पूलावरुन नेल्यास अपघात होण्याची शक्यता आहे.
या उड्डाणपुलावरून मोठे ट्रक, मोठे सामानाचे कंटेनर, ठाण्याच्या, नवी मुंबईच्या एसटी बसेस, लक्झरी बसेस, रिक्षा, चारचाकी आणि दुचाकींची वाहतूक चोवीस तास होत असते. ठाणे, मुंब्रावरुन पनवेलला जाण्यासाठी मोठे कंटेनरचे चालक या शीळ उड्डाणपूलाचा वापर जास्त करत असल्याने या रस्ता सोयीचा असला तरी तो दिवे बंद असल्याने वाहन चालकांना जिकरीचा होत आहे.
कल्याण - ठाणे मार्गावरील महत्वाचे ठिकाण असणाऱ्या शीळ भागातून धिम्या गतीने होणाऱ्या वाहतुकीला आता वेग प्राप्त झाला आहे. दोन्ही साईटने उड्डाण पूल हा वाहन चालकासाठी खुले करण्यात आले आहे. ११९ कोटी खर्च करून सुद्धा उड्डाण पुलावरील पद दिवे हे बंद आहेत. त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासांना आणि वाहन चालकाला होणाऱ्या त्रासापासून पालिका कधी सुटका करणार, रोड क्रॉसिंग करताना झेब्रा क्रॉसिंग नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना ही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आता तरी ठाणे महानगरपालिका लक्ष देणार का? असा सवाल नागरिक करत आहेत.
मी गेली १० वर्षे रिक्षा चालवत असून येथे शीळ जंक्शनवरील रिक्षा स्टॅंडला आम्ही सर्व रिक्षा लावतो. आता नवीनच झालेल्या या शीळ उड्डाणपूलामुळे वाहतूककोंडी सुटली असली तरी या पूलावरील बंद दिव्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. चारचाकी, रिक्षा आणि दुचाकीने या उड्डाणपूलावरुन प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आव्हान देण्यासारखे आहे. या पूलावरुन जाणाऱ्या मोठ्या कंटेनरच्या चालकाकडून वेगाने वाहतूक केल्यामुळे येथे अपघात होत आहेत. त्यात भर म्हणून दिवे बंद असल्याने या पूलावरुन दुचाकींची वाहतूक कमी झाली आहे.
- विनोद वास्कर, रिक्षाचालक
.jpeg)
.jpeg)
