Mumbai dharavi fire : धारावीत लागलेल्या आगीत सहा जण जखमी


मुंबई: मुंबईतील धारावी परिसरात मंगळवारी पहाटे भीषण आग लागली.  या घटनेत सहा जण भाजल्याचे वृत्त आहे.  सर्व जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  मुंबई अग्निशमन दलाने अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, धारावीच्या ९० फूट रोडवरील कला किल्ला धारावी परिसरात मंगळवारी पहाटे ३.५०.च्या सुमारास एका औद्योगिक संकुलात आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या १० गाड्या आणि पाण्याचे टँकर तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले. सकाळी ८.१० च्या सुमारास आग विझवण्यात आली.

धारावी झोपडपट्टी परिसरात असलेल्या अशोक मिल संकुलातील तीन मजली आणि चार मजली इमारतींना आग लागली, असल्याचे मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत किमान सहा जण भाजले. सर्व जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोन जण ३० ते ५० टक्के तर इतर दोघे ८ ते १० टक्के भाजले आहेत. अन्य एका तरुणाच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून उपचारानंतर त्याला रुग्णालयातून सोडूूूूूून देण्यात आले आहे. २६ वर्षीय सलमान खान, २६ वर्षीय मनोज, २२ वर्षीय अमजद, २८ वर्षीय सलाउद्दीन, २६ वर्षीय सैदुल रहमान आणि रफिक अहमद अशी जखमींची नावे आहेत.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला चार तास लागले. ही आग कपड्यांच्या कारखान्यातून लागली असावी असा संशय आहे. दोन्ही इमारतींमध्ये ठेवलेले लाकडी सामान, कपडे, फर्निचर व साहित्य जळून खाक झाले. सध्या आगीचे कारण समजू शकलेले नाही.



Post a Comment

Previous Post Next Post