काम रखडल्याने टोल वसुली थांबविण्याची खासदार धनंजय महाडिक यांची नितीन गडकरींकडे मागणी
नवी दिल्ली : सातारा ते कागल या महामार्गाचे काम दीर्घकाळापासून रखडले असून महामार्गावरील मोठमोठे खड्डे, ठिकठिकाणी निर्माण झालेली बाह्य वळणे यामुळे पुणे–कोल्हापूर मार्गावरून प्रवास करणे अत्यंत कठीण झाले आहे. या गंभीर स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय सडक परिवहन मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत बैठक घेतली. या बैठकीत सातारा–कागल महामार्गाच्या दुरवस्थेबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी कडक भूमिका मांडत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची आणि महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली थांबवण्याची मागणी केली.
सातारा–कागल महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम गेली दोन वर्षे सुरू आहे; परंतु कामाची गती अत्यंत मंद असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. महामार्गावर अनेक ठिकाणी खोल खड्डे असून वारंवार लागणाऱ्या बाह्य वळणांमुळे प्रवासाला प्रचंड वेळ लागत आहे. पावसाळ्यात महामार्गाची परिस्थिती अधिकच बिकट झाली होती.
या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी तसेच खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. बैठकीत बोलताना खासदार महाडिक म्हणाले की, सातारा–कागल महामार्गाचे काम अत्यंत रखडले असून गेल्या सहा महिन्यांत केवळ दोन टक्के काम झाले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला तात्काळ निलंबित करून नव्या सक्षम कंपनीकडे हे काम सोपवावे. तसेच महामार्ग सुस्थितीत येईपर्यंत वाहनधारकांकडून कोणताही टोल आकारू नये, अशीही त्यांनी ठाम मागणी केली.
यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाई सुरू केल्याचे स्पष्ट केले. तसेच खासदार महाडिक यांनी मांडलेल्या मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी बैठकीत सांगितले.
