ग्रँट रोड येथील रुबिनिसा मंझील इमारतीचा काही भाग कोसळला





एका महिलेचा मृत्यू तर तीन जण जखमी

मुंबई: मुंबईतील ग्रँट रोड पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी चार मजली रुबिनिसा मंझील इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीसह काही भाग सकाळच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. इमारतीत अनेक लोक अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू होते.




सदर दुर्घटनेची बातमी समजताच नागरी संरक्षण दल बृहन्मुंबई व ठाणे जिल्ह्यातील स्वयंसेवकांनी दुर्घटनास्थळी धाव घेतली व बचाव कार्य करण्याकरीता सहकार्य केले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोसळल्याच्या वेळी सुमारे ३५-४० लोक निवासी इमारतीत होते. बचावकर्ते कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या वाचलेल्यांचा शोध घेत होते. अपघातस्थळावरील अनेक व्हिडीओंमध्ये संरचनेचे इतर काही भाग अनिश्चितपणे लटकलेले दिसले. 


अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका,नागरी संरक्षण दल तसेच पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. या दुर्घटनास्थळी बचावकार्य व वाहतूक नियंत्रण करण्याचे काम नागरी संरक्षण दल बृहन्मुंबई व ठाणे जिल्ह्यातील स्वयंसेवकांनी केले. दुर्घटनास्थळी बचाव कार्य राजेश प्रभाकर -क्षेत्र -२ जी साऊथ विभाग, अयुब शिकलगर -ठाणे,  अजित पवार -क्षेत्र -३ एम पूर्व विभाग, सुरज जाधव -क्षेत्र -३ एम पूर्व विभाग, इसाकी पांडी -क्षेत्र -२ जी साऊथ विभाग, स्वप्नील सुर्वे -क्षेत्र -२ जी साऊथ विभाग, अमोल मोरे -ठाणे, महेश शिंदे -डोंबिवली यांचा समावेश होता. 




Post a Comment

Previous Post Next Post