कल्याणमधील सॅटिस कामाची आयुक्तांकडून पाहणी



डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण - डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी कल्याण रेल्वे स्थानकासमोर, स्मार्ट सिटी विभागामार्फत सुरू असलेल्या सॅटिसच्या कामाची शनिवारी २० तारखेला पाहणी केली. पहाटेपासूनच कल्याण परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे  बहुमजली पार्किंगसमोर पावसाचे पाणी साचले होते. महापालिकेच्या स्मार्ट सिटी विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी  तीन पंपांच्या सहाय्याने सदर पाण्याचा एका तासात निचरा केला.

सॅटिस कामांमध्ये कॅ. सुभाषचंद्र बोस चौक ते रेल्वे स्टेशन (दोन्ही बाजूने) तसेच रेल्वे स्टेशन ते बैल बाजार रस्ता या ठिकाणी ज्या अडचणी आहेत त्या अडचणी/ अडथळ्यांवर त्वरित कार्यवाही करून क्षेत्र उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना  दिल्या.

रेल्वे स्टेशन समोर रेल्वे विभागाने बाराशे  मिमी व्यासाचा पाईप कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सहाशे मिमी ड्रेनला  जोडल्याने बहुमजली पार्किंग समोर पावसाचे पाणी साठले. या पाईपची पाहणी करून सदर पाईपमधून येणाऱ्या प्रवाहाची विल्हेवाट  तांत्रिकदृष्ट्या करण्यासाठी रेल्वे विभागास कळविण्याबाबतही निर्देश महापालिका आयुक्त यांनी यावेळी दिले.




 त्याचप्रमाणे सदर परिसरात इतरत्र पडलेला कचरा, फेरीवाले यांचेवर तीव्र कारवाई कटाक्षाने करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त यांनी क प्रभागाचे सहा  आयुक्त तुषार सोनावणे यांना दिले.

रेल्वे स्थानकाजवळील सॅटिस प्रकल्पात जिथे जिथे अडचणी येत होत्या त्या ठिकाणी टीम समवेत स्पॉटनिहाय पाहणी करून त्या अडचणी दूर करण्याचे नियोजन  केले असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी यावेळी दिली.

या समयी परिमंडळ -१ चे उपायुक्त प्रसाद बोरकर परिमंडळ- 2 उपायुक्त रमेश मिसाळ, स्मार्ट सिटीच्या कार्यकारी अभियंता  रोहिणी लोकरे ,शहर विकासचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र टेंगळे ,स्मार्ट सिटीचे उपअभियंता संदीप तांबे, ब प्रभागाच्या सहा. आयुक्त सोनम देशमुख व क प्रभागाचे सहा. आयुक्त तुषार सोनवणे उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post