पोलिसानी लाठीचार्ज केल्यामुळे प्रवाशांची दगडफेक
बदलापूर: महाराष्ट्रातील ठाण्यातील बदलापूर येथील एका शाळेत शिशु वर्गातील मुलींच्या लैंगिक छळाच्या आरोपावरून जनता संतप्त झाली आहे. पोलीस प्रशासन आणि शाळा व्यवस्थापन करत असलेल्या चालढकलमुळे बदलापूरकरांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला. याप्रकरणी मोठ्या प्रमाणात लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. अनेकांनी लोकल ट्रेनही थांबवल्या आहेत. अनेक लोकांसह मुलींच्या पालकांनी शाळेला घेराव घालून निदर्शने केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी बदलापूर रेल्वे स्थानक जाम केले. आम्हाला लाडकी बहीण योजना नको, आम्हाला सुरक्षा द्या. सत्ताधारी कोणीही आलं नसल्याने महिलांनी नाराजी व्यक्त केली. वातावरण चिघळले आंदोलनकर्त्यांवर पोलिसानी लाठीचार्ज केल्यामुळे प्रवाशांनी दगडफेक केली.
ही घटना उघडकीस आल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने मुख्याध्यापक आणि आणखी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. मात्र, या घटनेविरोधात लोकांचा रोष उफाळून आला. शेकडो लोकांनी जमून आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली. मंगळवारी लोकांनी लोकल गाड्या थांबवून संपूर्ण चक्का जाम केला. त्यात पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केल्यामुळे प्रवाशांनी दगडफेक केली. यामुळे वातावरण चांगलेच चिघळले.
यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी तपासाचे आदेश दिले. मंत्री दीपक केसरकर यांनी या घटनेत पोलिसांच्या दक्षतेबाबत निवेदन दिले. याप्रकरणी वरिष्ठ आयपीएस आयजी आरती सिंग यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याची घोषणा फडणवीस यांनी केली. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात नेण्याचा प्रस्तावही ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आला आहे.

