नवी दिल्ली : सोमवारी सकाळी दिल्लीतील शाळांना पुन्हा एकदा बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली आहे. दोन शाळांना धमकीचे ईमेल आले आहेत. डीपीएस आरके पुरम आणि पश्चिम विहारच्या जीडी गोएंका स्कूलला बॉम्बची धमकी देणारा ईमेल मिळाला आहे. त्यानंतर शाळांनी मुलांना परत पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली. बॉम्बच्या धमकीनंतर अग्निशमन दल आणि पोलीस कसून तपासणी करत आहेत.
शाळेच्या पीक अवर्समध्ये शाळेच्या बसेस येतात, पालक आपल्या मुलांना शाळेत सोडतात आणि कर्मचारी सकाळच्या संमेलनाची तयारी करत असतात त्याचवेळी ही धमकी ईमेलद्वारे मिळाल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी सकाळी ६:१५ वाजता पहिला कॉल GD गोयंका स्कूलमधून दिल्ली अग्निशमन विभागाला आला. त्यानंतर DPS RK पुरमचा दुसरा कॉल सकाळी ७:०६ वाजता आल्याची माहिती मिळाल्याचे सांगण्यात आले. श्वान पथक, बॉम्ब शोधक पथके आणि स्थानिक पोलिसांसह अग्निशमन दलाचे अधिकारी शाळांमध्ये पोहोचले आणि शोध मोहीम हाती घेतली. आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नसल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
२९ नोव्हेंबर रोजी रोहिणीतील व्यंकटेश्वरा ग्लोबल स्कूलला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती. याच्या एक दिवस आधी प्रशांत विहार परिसरात कमी तीव्रतेचा स्फोट झाला होता. ज्यात एक जण जखमी झाला. राजधानीत सातत्याने अशा धमक्या येत असल्याचे पहावयास मिळत आहे. महिनाभरापूर्वी याच परिसरात असलेल्या सीआरपीएफ शाळेच्या भिंतीजवळ भीषण स्फोट झाला होता. या प्रकरणी अद्याप पोलिसांना आरोपींबाबत कोणताही सुगावा लागलेला नाही.