मोरबे धरणात सुमारे ८५ दिवस पुरेल इतका पाणीसाठा




मोरबे धरण परिसराची नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची पाहणी; पाणी जपून वापरण्याचे आवाहन


नवी मुंबई : महानगरपालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जात असून, हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे पर्जन्यमान ९२ ते ९४ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे. तसेच पावसास उशीर होणार असल्याचेही संकेत देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मोरबे धरण प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली.


पाहणीदरम्यान त्यांनी जलसाठ्याची सद्यस्थिती जाणून घेतली तसेच धरण परिसरातील दोन्ही बाजूंची सखोल तपासणी केली. जमिनीची मोजणी व सीमांकन निश्चित करून आवश्यक ठिकाणी तत्काळ कुंपण उभारण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


आयुक्तांनी आंबेवाडीपर्यंत ७.५ किमी आणि पिरकटवाडी व उंबरणेवाडीपर्यंत ११ किमी परिसराची पाहणी केली. धरण क्षेत्राबाहेरील काही खाजगी बांधकामांच्या अनुषंगाने हद्द तपासणी करून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तातडीने मोजणी करण्याचे निर्देश देण्यात आले.


सध्या मोरबे धरणात सुमारे ८५ दिवस पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाची अनिश्चितता लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन आयुक्तांनी केले. तसेच परिस्थितीनुसार पाणीपुरवठ्याच्या नियोजनाबाबत आवश्यक निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


धरण परिसरात देशी वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धन करावे तसेच स्वच्छता मोहीम राबवावी, असे निर्देशही त्यांनी दिले. याशिवाय पिरकटवाडी व आसपासच्या वाड्यांतील पुनर्वसन व मूलभूत सुविधांबाबतही तपासणी करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.


या पाहणी दौऱ्यात संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post