तांदूळ २९ रुपये किलोने मिळणार
नवी दिल्ली: तांदळाच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी सरकारने भारत राईस इनिशिएटिव्ह अंतर्गत किरकोळ दुकानांद्वारे कमी किमतीत धान्य विकण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न मंत्रालयामार्फत शुक्रवारी भारत तांदूळ बाजारात आणला जाणार आहे. भारत तांदूळ बाजारात २९ रुपये किलो दराने विकला जाणार असल्याचे सांगण्यात आले. भारतीय अन्न महामंडळ (FCI) द्वारे काही निर्यात आणि खुल्या बाजारातील विक्रीवर निर्बंध असूनही जास्त प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या तांदळाच्या वाणांच्या किरकोळ किमती कमी करण्याची ही योजना असल्याचे म्हटले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सध्या तांदळाच्या चढ्या भावाचा मुद्दा फार चिंतेचा विषय आहे. भारत राईस इनिशिएटिव्हचा किमती कमी होण्यावर काही परिणाम होण्याची शक्यता आहे. विक्रमी उत्पादन, पाइपलाइनमध्ये FCI कडे पुरेसा साठा आणि धान्य निर्यातीवर अनेक निर्बंध आणि शुल्क लादूनही तांदळाच्या देशांतर्गत किमती मोठ्या प्रमाणात उंचावलेल्या असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
आगामी काळात सरकार भारत डाळ आणि भारत पीठ उपक्रमांतर्गत चना डाळ आणि पीठ ६० रुपये प्रति किलो आणि २७.५ रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने विकत आहे. याशिवाय, FCI ने आत्तापर्यंत ओपम मार्केट विक्री योजनेंतर्गत आपल्या अतिरिक्त स्टॉकमधून ७ दशलक्ष टन (MT) गहू मोठ्या प्रमाणात खरेदीदारांना विकला असल्याचे समोर आले आहे.
अहवालानुसार, FCI सोबत सुमारे ०.४५ MT नॉन-फोर्टिफाइड तांदूळ साठा सुरुवातीला शेतकरी सहकारी संस्था NAFED, राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) आणि केंद्रीय भंडार यांसारख्या एजन्सीना किरकोळ विक्रीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे.