Dombivli news : डोंबिवलीत श्रावण महोत्सव पाककला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद




डोंबिवली ( शंकर जाधव ) :  श्रावण महिन्यात मिती ग्रुप माध्यमातून गेली दहा वर्षे उत्तरा मोने राज्यभर पाककला स्पर्धेचे आयोजन करतात. यावर्षी या स्पर्धेची प्राथमिक फेरी नुकतीच पूर्वेकडील आदित्य सभागृहात संपन्न झाली. स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत डोंबिवलीकरांची मिळालेली उत्स्फूर्त साथ आयोजकांना खूप मोलाची ठरल्याचे उत्तरा मोने यांनी स्पष्ट केले. स्पर्धेत ऐश्वर्या पुणेकर - (तांदळाची गुलाबाची फेणी), श्वेता बाम - (उकड चुरोझ), स्नेहा महाडिक - (कलिंगड डोसे (सरनोळी), पूर्ती सावंत - (राईस थ्रेडेड मशरूम स्टफ), प्रियांका सावंत - (राईस मेथी मोरींगा लाडू) यांच्या पदार्थांची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.




या पाककला स्पर्धेत तांदुळापासून पदार्थ करावयाचे होते. स्पर्धकांनी त्यानुसार विविध पदार्थ केले होते. पदार्थ भोवती सुंदर डेकोरेशन केल्याने पदार्थ उठून दिसत होता. सर्वच स्पर्धकांनी केलेले पदार्थ अतिशय चविष्ट आणि लक्षवेधी असल्याने स्पर्धेतील परीक्षकांना परीक्षण करतांना योग्य न्याय देण्यासाठी मोठी कसरत  करावी लागल्याचे खुद्द परीक्षक सांगत होते. सदर डोंबिवलीतील पाककला स्पर्धा प्राथमिक फेरी कविता गावंड यांच्या माध्यमातून  घेण्यात आली. यासाठी त्यांना लीना शिर्के यांची मोलाची साथ मिळाली. तसेच परीक्षक म्हणून जान्हवी सप्रे, भाग्यश्री लेले, डॉक्टर रेश्मा बाबरे, आरती निजापकार, विभा सप्रे, पल्लवी समेळ, पराग बापट, अमृता केतकर यांची महत्वाची भूमिका होती.

स्पर्धेबाबत उत्तरा मोने म्हणाल्या, या पाककला स्पर्धेचे हे दहावे वर्ष आहे. या दहा वर्षात कितीतरी महिलांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. डोंबिवलीत ही प्राथमिक फेरी होते आहे. पाककलेला प्रोत्साहन मिळावं म्हणून ही स्पर्धा घेण्यात आली आहे. महिलांबरोबर पुरुषही आता या पाककलेकडे जोडले जात आहेत. आपण म्हणत असतो की चौदा विद्या आणि  चौसष्ट कला, पण या चौसष्ट कलांमध्ये आता पाककलेलाही समाविष्ट करण्यात यावं असं वाटतंय! लोकांच्या दृष्टीने ही कला मर्यादित राहते, म्हणून या कलेला व्यासपीठ मिळावं हा उद्देश या स्पर्धेमागचा आहे. स्पर्धेत वैशिष्ट्यपूर्ण असे पदार्थ महिला तयार करीत असतात. या स्पर्धेत तांदुळापासून पदार्थ तयार करावयाचे होते.



Post a Comment

Previous Post Next Post