इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद
डोंबिवली ( शंकर जाधव ) : मुंबईतील परेल व्हिलेज येथे राहणारी रश्मी परब या महिलेने गडकिल्ले, उंच शिखर/पर्वत चढून जाणे, मोटारसायकलने भ्रमंती करणे, फोटोग्राफी करणे अशा प्रकारचे छंद जोपासले आहे. रश्मी परब ही श्री गणेशाची भक्त आहे. परब यांनी मोटारसायकलने एक दिवसात अष्टविनायकचे दर्शन घेवून पूर्ण करण्याचा निश्चय करत इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. रश्मी परबने सर्व अष्टविनायकाचे दर्शन १७ तास ७ मिनिटात पूर्ण केले.
१९ जुलै रोजी तिने पहाटे ५.१० वाजता वरद विनायक मंदिर (महड) येथून दर्शन घेवून आठही अष्टविनायक मंदिरांचा प्रवास तिने रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रॉ या मोटारसायकलवरून सुरू केला. एका दिवसात अष्टविनायक दर्शन मोटारसायकलने पार करण्याबाबतची माहिती रश्मीने इंडिया बुक रेकॉर्ड यांना दिली होती. त्यानंतर तिने केलेल्या विक्रमाची शहानिशा करून त्याची नोंद आपल्या इंडिया बुक रेकॉर्ड मध्ये करून त्याचे प्रमाणपत्र आणि मेडल रश्मी परबला देवून सन्मानित करण्यात आले.
बल्लाळेश्वर पाली, चिंतामणी थेउर, मयुरेश्वर मंदिर मोरगाव, सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक, महागणपती रांजणगाव, विघ्नेश्वर मंदिर ओझर आणि शेवटी गिरिजात्मज मंदिर (लेण्याद्री) येथे त्याच दिवशी रात्री १०.१७ मिनिटांनी हा प्रवास समाप्त केला. यासाठी रश्मी परब हिला सर्व अष्टविनायक दर्शनासह १७ तास ७ मिनिटे ( १२ तास २९ मिनिटे १९ सेकंद या फिरत्या वेळेसह ) इतका वेळ लागला. यासाठी एकूण ४६३.५१ किलोमीटर अंतर पार करावे लागले. एका दिवसात अष्टविनायक दर्शन मोटरसायकलने पार करण्याबाबत इंडिया बुक रेकॉर्ड यांना तिने तसे कळविले होते. त्यांनी याची त्यावेळी शहानिशा करून त्याची नोंद आपल्या इंडिया बुक रेकॉर्ड मध्ये करुन त्याचे प्रमाणपत्र आणि मेडल रश्मी परब हिला देवून तिला गौरविण्यात आले आहे. गणेशोत्सव त्या निमित्त रश्मी परब हिचे सर्व थरातून कौतुक होत असून काही गणेशोत्सव मंडळांनी तिची या कामाची दखल घेतली असून तिचा ते सन्मान येणार्या गणेशोत्सवात करणार आहेत.