मुंबई: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याचे उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये असलेली करोडो रुपयांची मालमत्ता सील करण्यात आली आहे. बँकर्सनी त्याच्या घराला बाहेरून कुलूप लावले आहे.
अता-पता लापता या चित्रपटाच्या निर्मितीसाठी अभिनेता (राजपाल यादव) यांनी मुंबईच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून ३ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर हमी म्हणून वडिलांच्या नावावरील जमीन व इमारत गहाण ठेवली होती. अशा स्थितीत कर्जाची रक्कम फेडता न आल्याने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पथकाने त्यांनी गहाण ठेवलेली कोट्यवधींची मालमत्ता सील केली. माहिती आणि बँक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता राजपाल (राजपाल यादव) याने ३ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, ते आता ११ कोटी रुपये झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी मुंबईतील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अधिकारी शहाजहानपूरला पोहोचले होते आणि त्यांनी येथे कारवाई सुरू केली होती. रविवारी त्यांनी या मालमत्तेवर बँकेचे बॅनर लावले. ही मालमत्ता सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबईची असून त्यावर कोणत्याही प्रकारची खरेदी-विक्री करू नये, असे त्यात लिहिले होते. सोमवारी सकाळी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबईच्या अधिकाऱ्यांनी ही मालमत्ता गाठून ती ताब्यात घेतली.