नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी आतापर्यंत सामान्य राहिली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेला ८ दिवस उलटले असून आतापर्यंत भारताच्या खात्यात फक्त तीन कांस्यपदके आली आहेत. हे तिघेही पदक नेमबाजीत आले आहेत. शूटिंग टीम भारतात परतली असून या टीमचे प्रशिक्षक समरेश जंग यांचे स्वागत मात्र अनोख्या पध्दतीने करण्यात आले आहे. समरेश जंग यांचे राहत असलेले घर जमीनदोस्त करण्याची नोटीस त्यांना देण्यात आली आहे. भारताचे नाव जागतिक पातळीवर उंचावण्यात मोलाची भूमिका पार पाडणारे समरेश जंग यांना मात्र बेघर व्हावे लागणार आहे.
दोन कांस्यपदके जिंकणाऱ्या मनू भाकेरचे प्रशिक्षक समरेश जंग आणि मिश्र संघात पदक जिंकणाऱ्या सरबज्योत सिंग यांचे घर कधीही उद्ध्वस्त होऊ शकते. समरेश जंग हे नवी दिल्लीच्या सिव्हिल लाईन्सच्या खैबर पास कॉलनीत राहतात. ज्या जमिनीवर खैबर पास कॉलनी आहे ती जमीन संरक्षण मंत्रालयाची आहे आणि त्यामुळे ती बेकायदेशीर असल्याचा दावा या नोटिशीत करण्यात आला आहे. आतापर्यंत या भागातील २५० घरांवर बुलडोझर चालविण्यात आलेला आहे. याप्रकरणी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या भूमी आणि विकास कार्यालयाने या भागातील सर्व लोकांना घर पाडण्याची नोटीस जारी केली आहे.
जंग स्वतः ऑलिम्पियन आहे. बीजिंग २००८ ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भाग घेतला होता. २००६ च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही त्यांनी पाच सुवर्ण पदके, एक रौप्य पदक आणि एक कांस्य पदक जिंकले होते. जंग म्हणतात की एक ऑलिम्पियन म्हणून, त्याला किमान सन्माननीय निरोपाची अपेक्षा आहे, तसेच या प्रकरणात किमान २-महिन्यांचा वाढीव कालावधी देण्याचे आवाहनही समरेश जंग यांनी केले आहे.
याबाबत जंग यांनी म्हटले आहे की, या तोडफोडीबाबत आपल्याला काहीच माहित नाही. लोकांची घरे का पाडली जात आहेत? त्यांनी अचानक संपूर्ण वसाहत बेकायदेशीर घोषित केली. काल रात्री आम्हाला सांगण्यात आले की आम्हाला दोन दिवसात जागा सोडायची आहे. माझे कुटुंब गेल्या ७५ वर्षांपासून येथे राहत आहे. १९५० पासून आम्ही येथील रहिवासी आहोत. 'भारतीय नेमबाजांनी दोन ऑलिम्पिक पदके जिंकल्यानंतर मी खूप उत्साहात घरी परतलो, पण निराशाजनक बातमी मिळाली की माझे घर आणि संपूर्ण परिसर दोन दिवसांत उद्ध्वस्त केले जाणार आहे.