कोयना नदीपत्रात ५२ हजार १०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग
कराड : कोयना धरण क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे कोयना धरणात ४७ हजार ३३६ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. सध्या पावसाचा जोर वाढल्याने धरणाचे सहाही वक्र दरवाजे साडेदहा फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. सध्या कोयना नदीपात्रात ५२ हजार १०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाढे व तहसीलदार अनंत गुरव यांनी रविवारी मुळगाव पूल आणि नेरले पुलाची पाहणी केली. पावसाचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने कोयना धरणातील पाण्याचा विसर्गाची पातळी वाढवावी लागत आहे मात्र त्यामुळे इतर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ देखील होत आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदी परिसरातील आजूबाजूच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहे.
दरम्यान, कोयना नदीवरील मुळगाव पूल व निसरे बंधारा हा गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पाण्याखालीच आहे तर येराड येथील स्मशानभूमीला पाण्याने वेढा दिल्याने अंत्यसंस्कार विधी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच करावे लागत आहेत.
कोयना धरणाच्या आजूबाजूला असलेल्या कोयना, नवजा, महाबळेश्वर सर्वच परिसरात पावसाचा जोर रविवारी वाढल्याने छोट्या नद्या, नाले,ओढ्यांमधून सरासरी ४७,३६३ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. कोयना धरणातून ५२,१०० क्युसेक्स पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. कोयना धरणात ८६.६३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेली ५ ते ६ दिवसपासून मुळगाव पूल पाण्याखालीच असल्याने गावातील लोकांचा संपर्क तुटलेला आहे.