दिव्यातील शाळांमध्ये गुड टच, बॅड टचसोबत स्वसंरक्षणाचे धडे

 


रोटरी क्लब दिवा ठाणे आणि सुभाष भोईर फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

दिवा, (आरती मुळीक परब) : सद्या महाराष्ट्रामध्ये अनेक भागात नराधमांकडून महिलांवर, लहान मुलींवर अत्याचार केले जात आहेत. हे अत्याचार कमी व्हावे वा थांबावे यासाठी रोटरी क्लब दिवा ठाणे यांच्या सौजन्याने आणि सुभाष भोईर फाउंडेशनच्या सहाय्याने दिव्यातील वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांना गुड टच, बॅड टच आणि स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. 




दिव्यातील ओम साई शिक्षण संस्थेचे एस.एम.जी. विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय- दिवा, सेंट मेरी हायस्कूल- दिवा, गणेश विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय- दातिवली, ड्यु ड्रॉप स्कूल, श्री गणपत वारेकर शाळा, आर. एन विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज, बेडेकर इंग्रजी शाळा- बेडेकर नगर या विविध शाळेंमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मिळावे, त्यांच्या बाबतीत घडणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना आळा बसावा व शालेय वातावरण सुरक्षित होण्यासाठी महिनाच्या कालावधीत दिवा विभागातील सर्व शाळांमध्ये अशा प्रशिक्षण सत्रांचे आयोजन रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे आणि सुभाष भोईर फाऊंडेशन मार्फत करण्यात येणार आहे.




अशा प्रकारचे उपक्रम दिव्यातील सर्व विद्यालयांमध्ये रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राबवण्यात येणार आहे. याची सुरुवात एस.एम.जी. विद्या मंदिर या शाळेपासून करण्यात आली.या उपक्रमामध्ये चुकीचा स्पर्श आणि चांगला स्पर्श याबद्दल लहान मुलांना माहिती देण्यात आली. तसेच कराटेचा स्वसंरक्षणासाठी कसा वापर करता येईल. हेही मुलांना शिकवण्यात आले. 




हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. तसेच ओम साई शिक्षण संस्थेचे संचालक स्वप्नील गायकर आणि रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे या संस्थेचे अध्यक्ष आदित्य रवींद्र पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेचे युवा शहर अधिकारी दिवा अभिषेक संतोष ठाकूर, सर्व शाळेमधील मुख्याध्यापकांचे, सर्व शिक्षकांच्या व इतर सर्वांचे अधिकार्‍याचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी मनःपूर्वक आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post