श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर करणाऱ्यांना आयुक्तांच्या हस्ते प्रशस्ती पत्र



कल्याण- डोंबिवली महापालिकेचा अभिनव उपक्रम

कल्याण,  (शंकर जाधव) :  नैसर्गिक जलस्त्रोतातील जल प्रदुषण टाळण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच नागरिकांना श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचा वापर करणेकामी प्रोत्साहीत करण्यासाठी काल रात्री वसंत व्हॅली येथे तयार केलेल्या कृत्रिम तलावाचा वापर करणा-या श्री गणेश मंडळाना/व्यक्तींना महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आली.


कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रात श्री गणेश विसर्जनासाठी महापालिकेने ६३ कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे, या कृत्रिम तलावांचा तसेच जास्तीत जास्त लोकांनी "विसर्जन आपल्या दारी” उपक्रमातंर्गत महापालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधेचा वापर करावा जेणे करुन लोकांना घरानजीक विसर्जनासाठी सुविधा उपलब्ध होईल तसेच यामुळे वाहतुक कोंडीलाही आळा बसेल अशी माहिती आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी यावेळी दिली.





महापालिकेने केलेल्या कृत्रिम तलावांच्या व्यवस्थेमुळे नागरीक नदी आणि खाडी ठिकाणी जाण्याऐवजी कृत्रिम तलावाला चांगला प्रतिसाद देत आहेत, मोठया संख्येने लोकांनी कृत्रिम तलावाला प्राधान्य दिले आहे हा एक चांगला ट्रेंड पहायला मिळतोय, लोकांनी शाडुच्या मातीचा वापर यावर्षी मोठया प्रमाणात केला आहे ही एक चांगली बाब आहे. महापालिकेने निर्माल्य संकलनासाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे आणि त्यापासून आपण खत निर्माण करुन वेगवेगळया ठिकाणी ट्रि प्लानटेशनसाठी त्याचा वापरणार करणार आहोत महापालिका पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यास प्राधान्य देत आहे अशीही माहिती आयुक्तांनी दिली. यासमयी शहर अभियंता अनिता परदेशी, माजी पालिका सदस्य सुनील वायले, उपायुक्त अतुल पाटील, अवधुत तावडे, प्रसाद बोरकर, कार्यकारी अभियंता जगदिश कोरे आणि इतर अधिकारी/कर्मचारी वर्ग उपस्थित होता.


यावेळी आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी दुगार्डी गणेश घाट येथील विसर्जन व्यवस्थेची देखील पाहणी केली. यावेळी त्यांनी कल्याण कोळीवाड्यामधील कोळी बांधवांच्या परिश्रमाची प्रशंसा करीत विसर्जन प्रकियेत कोळी बांधवांच्या सक्रिय सहभागाबाबत कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या सांस्कृतिक परंपरा जतन करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या योगदानाचे कौतुकही केले.




Post a Comment

Previous Post Next Post