मुंबई: नागरी संरक्षण संघटनेचे स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणारे राज्यस्तरीय महाविद्यालय मुंबईत क्रॉस मैदान, बॉम्बे हॉस्पिटल च्या लगत ( बाजूला ) आहे. या महाविद्यालयात राज्यभरातील स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापन विषयी विविध अभ्यासक्रम शिकवले जातात ज्यात सर्व प्रगतपाठ्यक्रम "प्रथमोपचार, अग्नीशमन, नियंत्रण व संदेशवहन , विमोचन, बॉम्ब शोध व संदेश यांसह अनेक महत्त्वाचे विषय" शिकवले जातात. या महाविद्यालयात प्रशिक्षित स्वयंसेवकांनी व मानसेवी अधिकारी/ प्रशासनिक कर्मचारी यांनी महाविद्यालयाचा ६१ वा वर्धापन दिन आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक सादर करून मोठ्या उत्साहाने साजरा केला. यामध्ये मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पालघरसह उरण येथील स्वयंसेवक व मानसेवी अधिकारी सहभागी झाले होते.
याप्रसंगी संचालक प्रभात कुमार ( भा. पो. से. ) यांनी उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना संघटना करत असलेल्या कामाचे कौतुक करून संघटनेला उभारी देण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच विविध उपक्रम राबवताना उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवकांना व कर्मचाऱ्यांना संचालकांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मानित केले. डोंबिवलीतील अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटाचे वेळी ठाणे व मुंबईतील स्वयंसेवकांनी तसेच मुंबईसह परिसरात घडलेल्या विविध आपत्तीमध्ये संघटनेच्या स्वयंसेवकांचा त्वरित सहभाग याबद्दल प्रशंसा करून संघटनेला अजून मोठ्या प्रमाणात उभारी देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
या सोहोळ्याच्यावेळी संघटनेचे प्रशिक्षित स्वयंसेवक व अधिकारी यानी बॉम्बस्फोटा सारख्या दुर्घटनेच्यावेळेस बचाव कार्य विविध पथकांद्वारे कशाप्रकारे करता येईल याचे अतिशय उत्कृष्ट व शिस्तबद्ध प्रात्यक्षिक सादर केले. तसेच दुर्घटनाग्रस्त इमारतीत अडकलेल्या व्यक्ति व जखमींची सुखरूप सुटका कशाप्रकारे केली जाईल याचे देखील प्रात्यक्षिक सादर केले. हे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष एका गजबजलेल्या चौकात घडत असल्याचा देखावा निर्माण करून बाजारात फिरणारे नागरिक, फेरीवाले आणि विद्यार्थी सर्व आपल्या गडबडीत असताना अचानक बॉम्बस्फोट होतो, आणि क्षणातच होत्याचे नव्हते होवून जाते, एकच हाहाकार माजतो , आणि अशावेळी नागरी संरक्षण संघटनेचे स्वयंसेवक येवून त्वरित बचाव कार्य सुरू करतात. आणि त्याचवेळी वरीष्ठ पातळीवर घटनेचा अहवाल पाठवून रुग्णवाहिका व विमोचन पथक मागविले जातात. व घटनेवर अतिशय जलद गतीने नियंत्रण मिळवले जाते. अशाप्रकारे प्रत्यक्ष चित्तथरारक घटना डोळ्यासमोर उभी केली गेली. त्याचप्रमाणे संघटनेचे स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष विविध आपत्तीमध्ये केलेल्या दुर्घटना निवारण व मदत व बचाव कार्याचे फोटोग्राफ चे चित्र प्रदर्शन संघटनेचे स्वयंसेवक राजेश प्रभाकर यांनी सादर केले होते. तसेच जयप्रकाश पुल्लकुडी यांनी हॅम रेडिओ ( सर्वात प्रतिकूल परिस्थितीत सर्वात प्रभावी दळणवळणाचे साधन ) चा सेटअप उभारून आपत्कालीन संपर्क यंत्रणा उभारली .आणि विविध आपत्ती व्यवस्थापन संबंधित उत्पादन करणाऱ्या कंपन्यानी त्यांचे स्टॉल लावून उत्पादनांची माहिती दिली.
या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी संघटनेचे संचालक प्रभात कुमार ( भा. पो. से. ) हे होते. तर अतिरिक्त नियंत्रक नागरी संरक्षण नरसिंग यादव ह्यांची विशेष उपस्थिती होती. या संपूर्ण सोहोळ्याचे आयोजन राजेश्वरी कोरी नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविद्यालयाच्या समादेशक व वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केले गेले होते. तसेच नागरी संरक्षण संघटनेचा कणा म्हणजे क्षेत्ररक्षक सेवा. ह्या संघटनेचे मुंबईचे मुख्य क्षेत्ररक्षक रविन्द्र वाडेकर, ठाणेचे उपमुख्य क्षेत्ररक्षक बिमल नथवाणी, करमबिरसिंग भुरजे तसेच योगेंद्र नानोस्कर , मधु कदम, मनजीतसिंग अरोरा, जयप्रकाश पुल्लकुडी ( जे पि ) , हनुमान चौधरी, रूपेश निंबाळकर, आयुब शिकलगार, राजेश प्रभाकर, प्रकाश ठमके, बुद्धदास जाधव यांच्यासह अनेक मानसेवी अधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते. त्याचप्रमाणे पोपट सांगडे- उपनियंत्रक मुंबई , विजय जाधव-उपनियंत्रक ठाणे यांच्यासह मुंबई , ठाणे व पुणे विभागातील सर्व सहाय्यक उपनियंत्रक तसेच महाविद्यालयीन प्रशिक्षक कर्मचारी हेदेखील उपस्थित होते. त्याचप्रमाणे नागरी संरक्षण संघटनेचे बरोबरीने हिंदुजा हॉस्पिटल , बेस्ट, रेल्वे, आगाखान यांचे आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी देखील सहभाग नोंदविला.
विशेष म्हणजे या सर्व सोहोळ्याचे आयोजन व नियोजन करण्यात सर्व प्रकारचे सहाय्य करणारे शहजाद लहरी, प्रेरणा लांगा, अश्विन शाह, लेफ्टनंट नायर, श्याम हेगडे, विश्वजीत सावंत इत्यादी मान्यवर देखील या सोहोळ्यास आवर्जून उपस्थित होते.