डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीतील तरुण शेफ अद्वैत जोशी यांनी आपल्या मंडळाच्या गणपतीसाठी तब्बल दीड किलो वजनाचा उकडीचा सुवर्ण मोदक बनवला आहे. हा मोदक गणपतीसमोर नैवेद्य म्हणून ठेवण्यात येणार आहे.
दीड किलो वजनाच्या या मोदकासाठी शुद्ध तांदळाचे पीठ, ताज खोबरं, गूळ, तूप ,वेलची आणि तर २४ कॅरेट सोन्याचा वर्क यांसारख्या दर्जेदार साहित्यांचा वापर करण्यात आला आहे. अद्वैत जोशीने 'शिदोरी' नावाचं उपहारगृह तीन वर्षांपूर्वी डोंबिवलीत सुरू केले. त्याचा खाद्य व्यवसायाशी कधीच संबंध नव्हता, तरीही त्याने हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेऊन आपली करिअरची सुरुवात केली.
"ओबेरॉय" हॉटेलमध्ये काम करत असताना त्याला जगभरातील विविध खाद्यपदार्थांचा अनुभव मिळाला. त्यानंतर त्याने क्रूझवर काम करत चांगला अनुभव आणि पैसा कमावला, परंतु २०२० मधील कोरोना महामारीमुळे त्याचं काम ठप्प झाले. यानंतर त्याने स्वतःचं काहीतरी वेगळं सुरू करायचं ठरवलं आणि "शिदोरी" उपहारगृह उघडलं. त्याने मराठी खाद्यपदार्थांना एक नवीन रूप दिले. ज्यामुळे त्याचं उपहारगृह लोकप्रिय ठरले. यंदाच्या गणेशोत्सवात त्याने बनवलेला दीड किलोचा मोदक गणेशभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

