शक्तीधाम रुग्णालयात प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्यू


कल्याण \ शंकर जाधव : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याण पूर्वेतील शक्तीधाम रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेच्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात संबंधित महिलेने वैद्यकीय उपचारांमध्ये हलगर्जीपणा झाल्याचा आरोप केला असून, या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांनी केली आहे.

घटनेची माहिती मिळताच महेश गायकवाड यांनी शक्तीधाम रुग्णालयात भेट देत डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाकडे याबाबत जाब विचारला. तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

मृत बाळाच्या आईने प्रसूतीदरम्यान आवश्यक वैद्यकीय उपचार व योग्य काळजी घेण्यात त्रुटी राहिल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत असून परिसरातही नाराजी व्यक्त होत आहे.यावेळी महेश गायकवाड म्हणाले, "महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गरीब व गरजू नागरिक उपचारासाठी येतात. मात्र अनेक ठिकाणी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. कधी औषधांचा तुटवडा, तर कधी डॉक्टरांची कमतरता अशा समस्यांमुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी रुग्णांशी अयोग्य वागणूक दिली जात असल्याच्याही तक्रारी आहेत."

"शक्तीधाम रुग्णालयातील या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. चौकशीत डॉक्टर अथवा संबंधित कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी," अशी मागणीही त्यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post