अनंत चतुर्दशी दिवशी होणाऱ्या श्री गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज !
कल्याण, (शंकर जाधव): अनंत चतुर्दशी दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज असून, कल्याण परिसरातील २२ नैसर्गिक विसर्जन स्थळी आणि ३० कृत्रिम विसर्जन स्थळांवर तसेच डोंबिवलीमध्ये ३० नैसर्गिक आणि २७ कृत्रिम विसर्जन स्थळांवर श्री गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे "विसर्जन आपल्या दारी"ही संकल्पना देखील महापालिकेच्या सर्व प्रभागात राबविली जाणार आहे.
महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत एकूण ७० जनरेटर, २७३५ हॅलोजन, १०३ टॉवर लाईटिंग, १८० सीसीटीव्ही कॅमेरे यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत दुर्गाडी गणेशघाट येथे ठेकेदाराचे १६ कर्मचारी (गोताखोर) आणि अग्निशमन विभागातील ६ कर्मचारी, लाईफ बोट, लाईफ जॅकेट, रस्सी, रबर बोट इ. साधन सामुग्री उपलब्ध राहिल.
त्याचप्रमाणे मोहने पंपींग स्टेशन गणेशघाट, यादवनगर गणेश घाट सिनेटरी अटाळी नदी, काळु नदी, वासुंद्री नदी, हनुमान मंदिर तलाव मांडा, बल्याणी तलाव, मोहिली पंप गणेश घाट, खारी आंबिवली गणेश घाट, गांधारी नदी, परिवहन गणेश घाट, गौरीपाडा तलाव, आधारवाडी तलाव, सापर्डे तलाव, उंबर्डे तलाव, नांदीवली व द्वारली तलाव, देवीचौक गणेश घाट, उमेशनगर, जुनी डोंबिवली गणेशघाट, कोपर तलाव, राजुनगर गणेशघाट, गणेशनगर खाडी, गोलवली तलाव, कुंभारखानपाडा तलाव गणेशघाट, लोढा संकुल /खाडी, निळजे तलाव, आयरेगाव तलाव, ठाकुर्ली चोळेगांव तलाव, भोईरवाडी तलाव व मोठा गाव गणेश घाट, इ. नैसर्गिक विसर्जन स्थळी देखील अग्निशमन विभागामार्फत सुविधा व कर्मचारी तैनात राहतील.
सर्व विसर्जन स्थळांवर घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कर्मचा-यांचे नियोजन करण्यात आले असून, प्रमुख नैसर्गिक विसर्जन स्थळी, निर्माल्य कलश तसेच सजवलेली घंटागाडी उपलब्ध राहणार आहे. त्याचप्रमाणे कृत्रिम तलावाच्या ठिकाणी देखील निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. एनएनएसचे विद्यार्थी आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे (एनजीओ) स्वयंसेवक निर्माल्य संकलनासाठी महापालिकेस सहाय्य करणार आहेत.