विधानसभा निवडणूक जाहीर
दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान
मतमोजणी दि.२३ नोव्हेंबरला
रायगड, : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ चा कार्यक्रम जाहिर केला आहे. रायगड जिल्ह्यात ७ विधानसभा मतदारसंघांसाठी दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी आचारसंहितेच्या काटेकोर व प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात येणार असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते.
- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे
- मंगळवार १५ ऑक्टोबर रोजी निवडणुकीची घोषणा आणि प्रेसनोट जारी करणे
- मंगळवार २२ ऑक्टोबर रोजी राजपत्र अधिसूचना जारी करणे
- मंगळवार २९ ऑक्टोबर रोजी नामांकन करण्याची शेवटची तारीख,
- बुधवार ३० ऑक्टोबर रोजी नामांकन छाननीची तारीख
- सोमवार ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारांनी माघार घेण्याची शेवटची तारीख
- बुधवार २० नोव्हेंबर रोजी मतदानाची तारीख
- शनिवार २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी
- सोमवार २५ नोव्हेंबर रोजी निवडणूक समाप्त.
रायगड जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघ
रायगड जिल्ह्यात १८८ -पनवेल, १८९-कर्जत, १९०-उरण, १९१-पेण, १९२-अलिबाग, १९३-श्रीवर्धन, १९४-महाड असे ७ विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये एकूण २ हजार ७९० मतदान केंद्र आहेत. निवडणूक कामासाठी पुरेसे मनुष्यबळ जिल्ह्यात उपलब्ध आहे. एकूण १७ हजार ४९७ कर्मचारी असून प्रत्यक्ष कामकाजसाठी १३ हजार ९५५ मनुष्यबळ आवश्यक आहे.
रायगड मतदारसंघात एकूण २४ लाख ६८ हजार १२० मतदार आहेत. यामध्ये पुरुष १२ लाख ५० हजार २५६ मतदार तर महिला १२ लाख १७ हजार ७७५ मतदार तर तृतीय पंथी ८९ आहेत. तर दिव्यांग १३ हजार ४८ तर १८ -१९ वयोगटातील ५१ हजार ६१२ मतदार आहेत. तर ८५ पेक्षा अधिक वयोगटातील ३५ हजार ८५९ मतदार आहेत.
नागरिकांच्या सोयीसाठी विविध ॲप
तक्रार करण्यासाठी स्वतंत्र ॲप
या निवडणुकीत cVIGIL ॲपचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही सामान्य नागरिकाला जर निवडणुकीत काही अफरातफर दिसून आली तर या ॲपवर जाऊन त्याची माहिती द्यायची आहे. फोटो अपलोड करण्याचीही सुविधा आहे. ज्या व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे त्याच्या लोकेशनवरून निवडणूक आयोगा सदर परिसराचा माग काढेल आणि १०० मिनिटांच्या आत आयोगाचे पथक त्याठिकाणी दाखल होईल.
मतदारसंघातील उमेदवारांची माहिती मिळवायची असेल तर मतदारांना Know Your Candidate (KYC-ECI) या ॲपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राजकीय जाहिरातींच्या प्रसारण पूर्व प्रमाणीकरणासाठी सर्व संबंधित राजकीय पक्ष ‘माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडे संपर्क करतील. त्यानुषंगाने आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे.
निवडणुकीसाठी जिल्हा यंत्रणा सज्ज
स्वतंत्र आणि निशपक्ष निवडणूक घेण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. निवडणुक कर्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २२ समित्या नेमण्यात आल्या आहेत. तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये समाजातील सर्व घटकांचा समावेश करण्यात येणार आहे.


