१४४ कल्याण निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांचे निर्देश
कल्याण, ( शंकर जाधव) : निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांनी आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने सहकार्याने व समन्वयाने काम करावे, असे निर्देश १४४कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी मंगळवारी दिले. सार्वत्रिक विधानसभा निवडणूकांची आदर्श आचारसंहिता भारत निवडणूक आयोगाने मंगळवारपासून जाहीर केली. त्याअनुषंगाने १४४ कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात नियुक्त नोडल अधिकारी यांची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांचे अध्यक्षतेखाली डोंबिवली येथील वै. ह भ प सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कार्यालयात संपन्न झाली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. २२ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत इच्छुक उमेदवारांची नामनिर्देशन पत्र स्वीकारली जाणार आहेत. दि. ३० ऑक्टोबर रोजी छाननी, दि. ४ नोव्हेंबर रोजी माघार, दि. २९ नोव्हेंबर रोजी मतदान व दि. २३ नोव्हेंबर रोजई मतमोजणी असा निवडणूकीचा कार्यक्रम आहे. या निवडणूकीच्या अनुषंगाने सहा.आयुक्त तथा नोडल अधिका-यांनी सार्वजनिक मालमत्ता, खाजगी मालमत्ता व शासकीय मालमत्तेवरील पोस्टर्स, बॅनर्स, कट ऑऊटस् इ. त्वरीत काढण्याची कारवाई करावी. तसेच कोनशिलेवरील राजकीय पदाधिकारी/पक्षाचे नाव असेल तर ते, झाकण्याची कार्यवाही करुन, तसा अहवाल २४/४८/७२ तासांत सादर करावा त्याचप्रमाणे “सीव्हीजील ॲपवर” प्राप्त होणा-या तक्रारींचे त्वरीत निराकरण करण्याचे निर्देश १४४- कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी या बैठकीत दिले.
तसेच झोनल अधिकारी यांच्या समवेत संपन्न झालेल्या बैठकीत आपल्या अखत्यारीतील मतदान केंद्राची पाहणी करुन सदर मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत याची पुन्हा खातरजमा करुन तसा अहवाल सादर करण्याबाबत निर्देश १४४ कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी दिले.
सदर बैठकीस महापालिकेचे उपायुक्त प्रसाद बोरकर, सहा.पोलीस आयुक्त (डोंबिवली) सुहास हेमाडे, पोलीस विभागातील इतर वरीष्ठ अधिकारी, १४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रध्दा चव्हाण, गट विकास अधिकारी तथा सहा.निवडणूक निर्णय अधिकारी संजय भोये, महापालिकेचे उपअभियंता तथा सहा.निवडणूक निर्णय अधिकारी राजू राठोड, सहा.आयुक्त संजयकुमार कुमावत, चंद्रकांत जगताप तसेच इतर समन्वय अधिकारी उपस्थित होते.


