Lawrence bishnoi brother : अनमोल बिश्नोईचा मोस्ट वॉन्टेड यादीत समावेश




नवी दिल्ली :  नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईचा 'मोस्ट वॉन्टेड' यादीत समावेश केला असून त्याला पकडून देणार्‍याला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनमोल बिश्नोई सध्या कॅनडा आणि अमेरिकेतून त्याची टोळी चालवत आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार, अनमोलवर १२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करण्याचा कट आणि एप्रिलमध्ये अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. त्याच्या अटकेसाठी एनआयएने इंटरपोलचीही मदत घेतली असून त्याच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर नजर ठेवली जात आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १४  एप्रिल रोजी अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांनी अनमोल बिश्नोईविरोधात लुकआउट सर्कुलर जारी केले होते. या घटनेची जबाबदारी अनमोलने सोशल मीडियावर घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावरील हल्ल्यात सहभागी असलेला शूटर अनमोलच्या संपर्कात होता आणि त्याने स्नॅपचॅटद्वारे त्याच्याशी संवाद साधल्याचेही तपासात समोर आले आहे. 



अनमोल बिश्नोईची टोळी पंजाब, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, चंदीगड, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांमध्ये सक्रिय आहे. या टोळीसाठी परदेशातून शस्त्रे पुरवली जातात, ज्यामध्ये अनमोल, गोल्डी ब्रार आणि लॉरेन्सचे काही जवळचे सहकारी महत्त्वाच्या भूमिका बजावतात. मिळालेल्या माहितीनुसार, अनमोल कॅनडातून या गुन्हेगारी कारवाया करत असून तो वारंवार अमेरिकेलाही जात असल्याचे आढळून आले आहे. एनआयएने अनमोलला 'मोस्ट वॉन्टेड' यादीत टाकले आहे आणि त्याच्या अटकेसाठी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे आणि त्याच्या ठावठिकाणाविषयी माहितीसाठी सर्वसामान्यांकडून मदतही मागितली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post