सुखोई ३०चे विमानाचे फ्लायपास
रायगड (धनंजय कवठेकर) : नवी मुंबईच्या दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाची हवाई दलामार्फत यशस्वी चाचणी संपन्न झाली. भारतीय हवाईदलाच्या ‘सी २९५’ विमानाचे विमानतळावर लँडींग झाले. यापूर्वी विमानाने आकाशात सात ते आठ घिरट्या घातल्या. त्यानंतर नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर विमानाची यशस्वी लँडींग झाली. हा ऐतिहासिक क्षण नवी मुंबईकरांनी आपल्या डोळ्यात साठवला. यावेळी सामान्य नागरिकांसह अनेक नेत्यांची मांदियाळी येथे पाहायला मिळाली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिडको अध्यक्ष संजय शिरसाठ आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत ही चाचणी घेण्यात आली. हे विमान धावपट्टीवर उतरताच त्याला ‘वॉटर सॅल्यूट’ करण्यात आले. भारतीय हवाईदलाचे 'सी २९५' विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडींग झाले, हा क्षण ऐतिहासिक असाच होता. ‘सी २९५’ विमानानंतर सुखोई ३० या विमानाने विमानतळावर फ्लायपास करत नागरिकांना सुखद धक्का दिला.
दरम्यान, या विमानतळावरुन मार्च २०२५ महिन्यात देशांतर्गत विमाने सुरू होणार असून आंतरराष्ट्रीय विमाने जून २०२५ पासून सुरू करण्याचा मानस सिडकोचे अध्यक्ष आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. नवी मुंबई विमानतळावरील एक धावपट्टी तयार झाली आहे. त्याची चाचणी घेण्यात आली आहे. विमानतळावर दोन रनवे तयार करण्यात आले आहे. विमानतळावरील ४ टर्मिनलवर जवळपास ३५० विमाने एकाच वेळी पार्क केली जाऊ शकतात. तसेच या विमानतळावर मेट्रोसह बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी असणार आहे. सिडकोकडून हे विमानतळ उभारण्यात येत आहे. नवी मुंबई विमानतळावर ४ टर्मिनल बिल्डिंग आहेत. मात्र तुम्ही कुठेही चेक इन केला तर प्रवाशांना त्यांच्या फ्लाईटपर्यंत पोहचता येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.