गंगापूरमध्ये सर्वाधिक ७९ लाख तर पैठणमध्ये १ लाख ४९ हजार ताब्यात
छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांमध्ये भरारी पथके व स्थीर सर्वेक्षण पथकाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. याच दरम्यान नऊ मतदारसंघांमध्ये आतापर्यंत एकूण १ कोटी ७९ लाख २१ हजार रुपयांची रोकड आणि इतर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
निवडणूक काळात पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी निवडणूक विभाग खास खबरदारी घेत आहे. पथकांच्या माध्यमातून वाहनांची, प्रवाशांची तपासणी केली जात आहे. निवडणुकीसाठी जिल्ह्यात भरारी पथके, स्थीर सर्वेक्षण पथके, व्हिडीओ चित्रीकरण करणारी पथके अशी विविध प्रकारची ३०० पथके स्थापन करण्यात आली आहेत. सर्वाधिक १५० स्थीर सर्वेक्षण पथके आहेत. त्यापाठोपाठ १०२ भरारी पथके आणि ४६ व्हिडीओ चित्रीकरण करणारी पथके आहेत. या पथकांनी नऊ मतदारसंघांमध्ये आतापर्यंत एकूण १ कोटी ७९ लाख २१ हजार रुपयांची रोकड आणि इतर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सर्वाधिक ७९ लाख रुपयांची रक्कम गंगापूर मतदारसंघात जप्त करण्यात आली आहे. सर्वात कमी १ लाख ४९ हजारांची रक्कम पैठण मतदारसंघात जप्त केली गेली. राज्यात १५ ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
पन्नास हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम आढळल्यास त्याबाबत विचारपूस करण्यात येत असून समाधानकारक खुलासा न केल्यास ती रक्कम कशाची आहे, याबाबतचे पुरावे सादर न झाल्यास संबंधित रोकड तसेच सोने, चांदी मुद्देमाल जप्त केला जात आहे.
